मालवण,दि १४ मार्च
ठाकरे शिवसेनेचे नेते, सचिव तथा सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांचा उद्या दि. १५ मार्च रोजी वाढदिवस मालवण तालुक्यात धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे, गावागावातील मंदिरांमध्ये शिवसैनिकांकडून खास राऊत यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी विजयी अभिषेक केला जाणार आहे, अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मालवण येथील ठाकरे शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हरी खोबरेकर यांनी खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवस कार्यक्रमाबाबत माहिती दिली. खोबरेकर म्हणाले, खासदार श्री. राऊत यांचा वाढदिवस उद्या १५ मार्च रोजी साजरा होत आहे. यानिमित्त मालवण तालुका शिवसैनिकांच्या वतीने श्री. राऊत यांना दीर्घायुष्य लाभो आणि या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या विजयाची हॅट्रिक व्हावी यासाठी सर्व विभागातील मंदिरांमध्ये विजयी अभिषेक केला जाणार आहे. आचरा, किर्लोस, शहरातील रामेश्वर मंदिरासह अन्य ठिकाणच्या मंदिरात विजयी अभिषेक केला जाणार आहे.
येणाऱ्या २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत विनायक राऊत हे समोरच्या उमेदवाराचा डिपॉझिट जप्त करून विजयी व्हावे आणि आजच्या लोकांच्या मनामध्ये असलेली खदखद मतदानाच्या रूपातून बाहेर येऊ दे अशी प्रार्थना केली जाणार आहे. १५ रोजी सायंकाळी श्री. राऊत हे जिल्ह्यात येणार असून ओरोस येथील कळंदे हॉल येथे ते हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. या सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही श्री. खोबरेकर यांनी केले.