बंदी आदेशाची अंमलबजावणी करावी अध्यक्ष नारायण सावंत यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छींद्र सुकटे यांच्याकडे मागणी
सावंतवाडी दि.१५ मार्च
सिंधुदुर्ग जिल्हा निसर्ग सौंदर्य, पर्यावरण पूरक असल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती आणि देव देवतांच्या मूर्ती बनविणे, साठवणूक करणे आणि विसर्जित केल्याने पर्यावरणाला हानिकारक ठरत आहे. त्यामुळे बंदी आदेशाची अंमलबजावणी करावी अशी मागणी श्री गणेश मुर्तीकार संघाचे अध्यक्ष नारायण उर्फ बापू सावंत यांनी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छींद्र सुकटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात निसर्ग सौंदर्यांची जोपासना करणे हे आम्हा सिंधुदुर्गवासियांचे कर्तव्ये आहे. येथे सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. त्यात गणेश उत्साव हा घराघरात गणेशमूर्तीचे पूजन करुन साजरा केला जातो. पूर्व कालापासून गणेशमूर्ती ही मातीचीच केली जाते. ती पाण्यात सहज विरघळणारी असते. पण गेल्या ८ ते १० वर्षांपासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पि.ओ.पी.) गणेशमूर्ती जिल्ह्याबाहेरुन आयात केल्या जात आहेत. त्या पाण्यात विरघळत नसल्याने समुद्र किनारी, नदी किनारी, तलावात, नाल्यात त्या मूर्त्या विसर्जन झाल्यावर बरेच महिने भग्नावस्थेत दिसतात. ज्या भावनेने सनोभावे मूर्तीच पूजा केलेली असते त्या अशा अवस्थेत दिसल्यावर धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत.धार्मिकदृष्ट्या ह्या मूर्त्या मातीच्याच असाव्यात हे धर्मशास्त्रात ऋषीमुनींनी सांगितलेले आहे आणि त्या ग्रंथाच्या आधारेच पूर्वापार मातीच्याच मूर्त्या बनविल्या जात आहेत असे या निवेदनात म्हटले आहे.
सिंधुदुर्गात मातीच्या मूर्त्या करणारे हजारो कारागिर आहेत. त्यांच्या पिढ्यान पिढ्या गणेश मूर्ती बनविण्याच्या शाळा (कारखाने) आहेत. पण ज्यांना ह्या मातीवर काम करणे जमत नाही किंवा काम करण्याचा आळस असल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पि.ओ.पी.) तयार मूर्त्या पेण, पनवेल, कोल्हापूर येथून आणून विकल्या जात आहेत. बाहेरुन मूर्त्या आणून विकत असल्याने सिंधुदुर्गातील गोरगरीबांचा पैसा जिल्ह्याबाहेर जात आहे व खऱ्या करागिरांचे काम कमी होत आहे हे असेच चालले तर मातीच्या मूर्त्या तयार करणाऱ्या कारागिरांवर उपासमारीची पाळी येईल, असे बापू सावंत यांनी म्हटले आहे.
केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शन तत्वानुसार मूर्ती व्यवसायातील (पि.ओ.पी.) वर बंदी आणून १० वर्षे झाली तरी अद्याप या निर्णयाची अंमलबाजावणी झाली नाही. १२ मे २०२० रोजी केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने उत्सावासंबंधी मार्गदर्शक तत्वे जाहिर केली त्यामध्ये पि.ओ.पी. मूर्ती घडवू नयेत अशी स्पष्टता दिली आहे. जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळास न्यायालयाने दिलेल्या आदेशान्वये ही बंदी देशभरात लागू झाली आहे. तशीच ती महाराष्ट्र राज्यासही लागू झाली आहे. पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्ह्यासही लागू आहे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारे सुट देण्यात आली नाही असे म्हटले आहे
महाराष्ट्र राज्य नियंत्रण मंडळाचे चेअरमन व जनसंपर्क अधिकारी श्री. संजय भुस्कुटे यांची महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या प्रतिनिधीची दि.२९ मार्च २०२२ रोजी प्रत्यक्ष भेट घेवून त्यांच्याशी याबाबत चर्चा केली असता पि.ओ.पी. बंदी बाबत यापूर्वीच सर्व जिल्हा, नगरपालिका यांना आदेश दिल्याचे सांगितले, याकडे सावंत यांनी लक्ष वेधले आहे.
पी. ओ.पी. मूर्ती निर्मिती, विक्री, आयात व साठवणूक यावर प्रभावी अंमलबजावणीसह दंडात्मक कार्यवाही व्हावी याकरीता नगरपालिका जिल्हा परिषद यांना स्मरणपत्र देवून तात्काळ पी.ओ.पी. मूर्ती बंदीचे ग्राम पातळीपर्यंत आदेश देण्यात यावेत. राज्य शासनाने पोलिस विभागाला पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ अंतर्गत कायदेशीर कार्यवाही करण्याचे अधिकार देणे पी.ओ. पी. मूर्ती निर्मिती कार्यशाळा आढळल्यास ती सील करुन दंडात्मक कार्यवाही करावी. पी. ओ.पी. मूर्ती वहातूकीवर बंदी घालून अशी वहातूक सापडल्यास दंडात्मक कार्यवाही करावी.या आदेशाची मानहानी करणाऱ्यावर पी.ओ.पी. मूर्ती बंदीच्या न्यायालयीन आदेश व सी.पी.सी.बी. च्या पी.ओ.पी. मूर्ती बंदीच्या निर्देशांना झुंगारुन अजूनही पी.ओ.पी. मूर्ती निर्मिती, आवक व साठवणूक करीत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी श्री गणेश मुर्तीकार संघाचे अध्यक्ष नारायण उर्फ बापू सावंत यांनी केली आहे.