बुरंबावडे येथे मध्यरात्री अचानक तीन गाड्या पेटून खाक गावात चिंतेचे वातावरण

तळेरे,दि.१५ मार्च

देवगड तालुक्यातील बुरंबावडे येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एका मागून एक तीन गाड्या पेटून खाक झाल्याची दुर्घटना घडली. एकाएकी अचानक तीन गाड्या पेट घेऊन जळून खाक झालेल्या आहेत. या गाड्यांमध्ये एक मोटर सायकल, एक रिक्षा आणि एक तवेरा अशा तीन गाड्यांचा समावेश आहे.

बुरंबावडे येथे गुरुवारी मध्यरात्रीनंतर सत्यवान बापू नार्वेकर यांच्या घराच्यालगत मागील बाजूस शेडमध्ये उभ्या केलेल्या त्यांच्याच मोटर सायकल (एम्. एच्. ०७ ए क्यू २६४०), रिक्षा (एम् एच्.
०७ एस् ५७५४) आणि
तवेरा (एम्. एच्. ०९ बी एक्स ४४०४) या तीन गाड्यांना एकाएकी आग लागून स्फोट झाले. या आवाजाने जागे होऊन समोरील घरात असलेल्या एका महिलेने बाहेर झोपलेल्या सत्यवान नार्वेकर यांच्या मुलाला जागे केले. समोरील घटनास्थळी त्याचे लक्ष गेले असता मोटर सायकल पेटत असल्याचे त्यांनी पाहिले. आपल्या घरातील वडील, भाऊ यांना त्याने दरवाजा ठोकून जागे केले. दरम्यान पाणी फेकून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्फोट होऊन शेडच्या छप्पराचे पत्रेही फुठून गेले. छप्पराचे चॅनेल ज्वाळांनी तापून वाकून गेले. आग शांत झाल्यानंतर तिन्ही गाड्या पूर्णतः जळून खाक झाल्याचे निदर्शनात आले.

सदरप्रसंगी तातडीने पाटगाव पोलीस दूरक्षेत्र येथे भ्रमणध्वनीवरून संपर्क करून घटनेचे वृत्त पोलिसांना कळविण्यात आले‌. यानंतर शुक्रवारी सकाळी पाटगाव पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, अंमलदार ए. बी. गुणिजन यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची पाहणी केली.

अचानक एकापाठोपाठ एक तीन गाड्या पेट घेण्याच्या या घटनेने गावात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. सुस्थितीत उभ्या असणाऱ्या गाड्यांना अशी अचानक आग कशी लागली याबाबत सर्वत्र आश्चर्य आणि चिंता व्यक्त होत आहे. याबाबत पाटगाव पोलीस दुरुक्षेत्राशी संपर्क साधला असता सदर प्रकरण जळीत म्हणून नोंद करून घेऊन पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण व त्यांचे सहकारी करीत असल्याचे पोलिसांकडून कळते.