कृषि सेवक पदी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

सिंधुदुर्गनगरी,दि‌ १५ मार्च

कृषी विभागातर्फे घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमध्ये कृषी सेवक पदी निवड झालेल्या जिल्ह्यातील नितेश पाताडे व स्नेहा खोत यांचा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तसेच मॉडेल करिअर सेंटर, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांनी मुलांना युपीएससी, एमपीएससी, बँकिंग, पोलीस भरती, आर्मी भरती, तसेच इतर सरळसेवा परीक्षां बद्दल मार्गदर्शन करत कौशल्य विकास विभागात असलेल्या भव्य निशुल्क ग्रंथालय व स्टडी रूम याचा जास्तीत जास्त मुलांनी लाभ घ्यावा असे आवाहन करत मुलांना प्रोत्साहन दिले. यावेळी त्यांनी मुलांना भावी अधिकारी घडवण्यासाठी त्यांच्या विभागातर्फे वेळोवेळी विविध उपक्रम राबवण्यात येतील याची ग्वाही दिली.

मंत्रालयाचे श्रम व रोजगारचे, निखील दवणे यांनी यावेळी निवड झालेल्या मुलांना शुभेच्छा देत स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मुलांनी सातत्य कसे ठेवावे व मुलाखतीस कसे सामोरे जावे याबद्दल मुलांना मार्गदर्शन केले.

कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी कृष्णा कविटकर यांनी मुलांना भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या व स्टडी रूम मधील इतर उमेदवारांसोबत शासकीय सेवांबाबत चर्चा केली. यापुढेही युपीएससी, एमपीएससी, बैंकिंग, पोलीस भरती, आर्मी भरती व सरळ सेवा भरती बाबतचे मार्गदर्शन केले जाईल असे जिल्हा कौशल विकास, रोजगार व मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग.पां. चिमणकर यांनी सांगितले.