घोणसरी मार्गांवर सुरु असलेले मोरीचे बांधकाम बोगस?

बांधकाम विभाग आणि ठेकेदाराबाबत स्थानिकांमधून संताप व्यक्त

फोंडाघाट,दि.१६ मार्च(संजय सावंत)
फोंडाघाट घोणसरी मार्गावरील आ.नितेश राणे यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या पुलाचे व मोरीचे बांधकाम स्थानिक ठेकेदाराकडून बोगस पद्धतीने केले जात असून बांधकाम विभागाच्या सुपरवायझर ने सूचना करूनही मनमानीपणे बांधकाम सुरु ठेवल्याने स्थानिक ग्रामस्थान मधून संताप व्यक्त केला जात आहे.
आम.नितेश राणे यांच्या प्रयत्नातून आणी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी उपलब्ध करून दिलेल्या 96,09,980/-रु. निधी खर्चून कणकवली तालुक्यातील राज्य मार्ग क्र.178 ते करुळ,नावळे ,सडूरे कुर्ली,घोणसरी,फोंडा रस्ता प्रजीमा 6 किमी 26/050 ते 28/250,28/860 ते 29/310 मध्ये सुधारणा व डांबरीकरण करणे काम सुरु असून पैकी 28 /860 ते 29/310 मध्ये स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर व या घोणसरी रोड वरील मोरी वरून पावसाळ्यामध्ये पाणी जात असल्याने या मार्गांवरून शाळेला जाणाऱ्या मुलांचे अतोनात हाल होत असल्याने मुख्य अभियंता अजयकुमार सर्वगौड यांनी पुढाकार घेऊन वाढीव बजेट करून या मार्गांवर उंच पूल बांधणे आणी गटार मोरी सहित कामाची मंजुरी देऊन सदर काम स्थानिक ठेकेदारास देण्यात आले.
दरम्यान काम सुरु झाल्यापासून बांधकामावर पाणी न मारणे तसेच बांधकाम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे यावरून स्थानिक ग्रामस्थ किंबहुना बांधकाम विभागाने नियुक्त केलेल्या सुपरवायझर कडूनही वेळोवेळी संबधीत अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या मात्र या ठेकेदाराकडून या तक्रारी आणि अधिकाऱ्यांच्या सूचना कडे दुर्लक्ष करून मनमानी पणे काम सुरु आहे. आता सुरु असलेल्या मोरीच्या कामामध्ये निकृष्ठ दर्जाचे सिमेंट वापर होत असून वाळूचा जराही वापर न करता खडी ची बारीक पावडर वापरून बांधकाम होत असल्याने या कामावरील बांधकाम विभाग सुपरवायझर यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार सदर बोगस काम थांबविण्याच्या सूचना करूनही या ठेकेदाराने मनमानी पणे अधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आपले मोरीचे बोगस काम पूर्ण केले.
जनतेचा पैसा वापरून अशा प्रकारचे केलेले बोगस काम किती दिवस टिकणार ? अधिकाऱ्याच्या आदेशाला फाट्यावर मारून अशा प्रकारचे बोगस काम ठेकेदार कोणाच्या जीवावर करत आहेत ? आणि सिंधुदुर्ग बांधकाम विभागा मध्ये प्रामाणिक आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून नवलौकिक असणारे मुख्य अभियंता सर्वगौड अशा ठेकेदारांना पाठीशी घालणार का ? असे प्रश्न स्थानिक संतप्त ग्रामस्थानमधून विचारले जात आहेत