कणकवली दि.१६ मार्च(भगवान लोके)
लोकसभा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात शनिवारी पोलिसांनी पथ संचलन केले. यात दहा अधिकारी, ८० अंमलदार, दोन आरसीएफच्या तुकड्या आणि १५ होमगार्ड सहभागी झाले होते.
कणकवली पोलिस ठाणे येथून पोलिस निरीक्षक समशेर तडवी यांच्या नेतृत्वाखाली सकाळी पथ संचलनाला सुरवात झाली. पोलिस स्थानकातून कणकवली बाजारपेठ ते पटकीदेवी मंदिर तेथून एस.टी. बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुन्हा पोलिस ठाणे असे पथ संचलन करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू होणार आहे. शनिवारी निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे या निवडणुकीच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलिस दलाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांना निर्भीड वातावरणात कोणत्याही दबावाला बळी न पडता मतदान करता यावे यासाठी पोलिस दलाकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे पथ संचलन करण्यात आले. पोलिस अधिक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार हे पथ संचलन करण्यात आले.