सेवांगणतर्फे पुरुषांसाठी आयोजित पाककला स्पर्धेत सहदेव साळगावकर प्रथम

मालवण,दि.१६ मार्च

मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे महिला दिनानिमित्त खास पुरुषांसाठी आयोजित पाककला स्पर्धेला तरुण व प्रौढ पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत देवबागचे सहदेव साळगावकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर कुणाल बांदेकर यांनी द्वितीय व गौरव किनळेकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण संचालित कौटुंबिक सल्ला केंद्र आणि महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त पुरुषांसाठी पाककला स्पर्धा संस्थेच्या दादा शिखरे सभागृहात संपन्न झाली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून आहारतज्ज्ञ डॉ. विनया बाड या उपस्थित होत्या. उपस्थित सर्वांचे स्वागत करून पाककला स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. स्पर्धेसाठी आरोग्यदायी, पौष्टिक पदार्थ अशी संकल्पना ठेवण्यात आली होती. त्यानुसार स्पर्धकांनी विविध खाद्यपदार्थ बनवून स्पर्धेत मांडले होते. परीक्षण सौ. तृप्ती राणे, मेघा सावंत व डॉ. विनया बाड यांनी केले. यावेळी डॉ. विनया बाड यांनी मार्गदर्शन केले.

स्पर्धेला जिल्ह्यातून एकूण ३५ स्पर्धकांनी सहभाग दर्शविला. या स्पर्धेत श्री. चंद्रकांत आचरेकर, श्री. रणजित परब, श्री. क्षितीज हुनारी, श्री. योगेश सावंत, श्री. ऋतुराज मालंडकर या पाच स्पर्धकांनी उत्तेजनार्थ म्हणून निवडण्यात आले. विजेते व उत्तेजनार्थ स्पर्धकांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी संस्थेच्या महिला व बाल विकास समितीच्या कार्याध्यक्ष सौ. विणा म्हाडगुत, सदस्या सौ. श्वेता पेडणेकर, सौ. मृण्मयी खोबरेकर, सौ. मंगलताई परुळेकर, सौ. ज्योती तोरस्कर तसेच संस्थेचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष श्री. पद्मनाभ शिरोडकर, कार्यवाह श्री. लक्ष्मीकांत खोबरेकर, कोषाध्यक्ष श्री. शैलेश खांडाळेकर, व्यवस्थापक श्री. संजय आचरेकर व संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. या स्पर्धेला जयहिंद कॉलेज साळगावचे कार्यकारी अधिकारी प्रवीण केळुसकर व प्रा. टेरी डिसा यांचे सहकार्य लाभले. लोकेश तांडेल, देवबाग यांनी सर्व स्पर्धकांनी बनवून आणलेल्या पदार्थांची व्हिडिओ क्लिपचे संकलन करण्याची धुरा सांभाळली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अदिती कुडाळकर तर आभार प्रदर्शन सौ. वैष्णवी आचरेकर यांनी केले.