खोटं बोलणे पण रेटून बोलणे हे येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला महागात पडणार-तालुकाप्रमुख राजा गावकर

मालवण,दि.१६ मार्च

स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन व्हावा ही मच्छिमारांची अनेक वर्षांची मागणी आहे. या मागणीची दखल घेऊन सिंधुरत्न समिती सदस्य किरण सामंत तसेच उद्योगमंत्री उदय सामंत या बंधूनी विशेष पाठपुरावा करून अवघ्या दोनच दिवसात मंत्रालयीन स्तरावर सातत्याने मागणी लावून धरली. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी याचे फुकाचे श्रेय घेऊ नये. खोटं बोलणे पण रेटून बोलणे हे येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला महागात पडणार असल्याचा इशारा शिवसेना मालवण (शिंदे गट ) तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी पत्रकातून दिला आहे.

श्री गावकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, विशेष अधिवेशनामध्ये स्वतंत्र अंमलबजावणी कक्षाची मागणी लावून धरताना तात्काळ याची अंमलबजावणी करून घेतली. लागलीच या स्वतंत्र अंमलबजावणी कक्षासाठी जी समिती स्थापन केली त्यासाठी मत्स्य उद्योग मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधून हा शासन निर्णय तात्काळ करून घेतला. याचे साक्षीदार म्हणून मी स्वतः दोन दिवस मंत्रालयस्तरावर पाठपुरावा करत होतो आणि त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र रविकरण तोरसकर हेही दोन दिवस सातत्याने उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या संपर्कात राहून त्यांचे सोबत पाठपुरावा करत होते. त्यामुळे या शासन निर्णयाचे कुणीही फुकटचे श्रेय घेऊ नये कारण विद्यमान आमदार वैभव नाईक आणि त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना नेहमीच फुकटचे श्रेय घेण्याची सवय झाली आहे याची प्रचिती त्यांनाही आणि जनतेलाही वारंवार आली आहे. त्यामुळे किमान आता तरी या सर्वांनी हे लंकेचे ढोल बढवणे थांबवावे. कारण जनतेला आता सर्व बाबी कळून चुकल्या आहेत. त्यामुळे जनता हे जाणते की कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर विश्वास ठेवू नये. त्यामुळे एक फुकटचा सल्ला देऊ इच्छितो की हिम्मत असेल तर स्वतः पाठपुरावा करून एखादे काम मार्गी लावा आणि त्यानंतरच त्याचे गोडवे गा . परंतु या सर्वांना या गोष्टीची सवयच झाली आहे की खोटे बोला पण रेटून बोला. आता हे खोटे बोलणे यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये कसे महागात पडेल हे मतदानानंतर मतमोजणीच्या दिवशीच दिसेल.

महाराष्ट्र राज्याला ७२१ किलोमीटरची सागरी किनारपट्टी लाभली आहे. किनारपट्टीवरील मच्छीमार समुदाय हा प्रामुख्याने मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करत आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणी सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांमध्ये मत्स्य व्यवसायाचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रामध्ये मासेमारी चालते. त्यावर महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय खात्याचे नियंत्रण आहे. परंतु गेले कित्येक वर्ष परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स विशेषतः कर्नाटक मलपी येथून येणाऱ्या मच्छिमारांनी महाराष्ट्राची मत्स्यसंपदा लुटून नेली आहे. त्याचा परिणाम मत्स्य खाते तसेच मत्स्य व्यवसायावरही झाला आहे. परप्रांतीय नौका झुंडीने येऊन सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ले करणे, स्थानिक मच्छीमारांच्या बोटी फोडणे हे नित्याचे झाले आहे. महाराष्ट्राच्या सागरी जलधी क्षेत्रामध्ये या परप्रांतीय नौकांच्या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी आत्ताची मत्स्य व्यवसाय खात्याकडे असलेली साधन सामग्री व मनुष्यबळ अपुरे आहे. यासाठी राज्यातील विविध मच्छीमार संघटना परप्रांतीय अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्षाची स्थापना व्हावी ही मागणी सातत्याने करीत होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आजपर्यंत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी अथक परिश्रम केले त्याचप्रमाणे विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर असलेले आमचे नेते दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, निलेश राणे तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि उदय सामंत त्यानंतर किरण सामंत हे सर्वजण कटिबद्ध आहेत. त्यामुळे विरोधकांनी या एका गोष्टीची मोट नक्कीच बांधावी की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याची धमक ती फक्त आणि फक्त महायुतीच्या नेत्यांमध्येच आहे आणि त्यावर फुकटचे श्रेय आणि अपप्रचार करून तोंडसुख घेण्याची धमक ही तुमच्या आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे. त्यामुळे हिम्मत असेल तर इतरांनी केलेल्या विकास कामांचे फुकटचे श्रेय घेऊन त्यावरती बोलण्यापेक्षा स्वतः तुमच्या आमदार, खासदारांच्या निधीतून केलेल्या विकास कामांवर बोला. दिवसेंदिवस महाराष्ट्राच्या विकासाचे व्हिजन असलेले आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा चढता आलेख बघून महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे बरेचसे पदाधिकारी कार्यकर्ते नेते हे आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे इतरांवर बोलण्यापेक्षा स्वतःचे कार्यकर्ते आणि नेते यांना सांभाळा नाहीतर एक दिवस असा येईल की ना काम करण्यासाठी कोणी राहील ना बोलण्यासाठी कोणी राहील ना मत मागण्यासाठी कोणी राहील असा टोलाही राजा गावकर यांनी लगावला.