जादूटोणा विरोधी कायदा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक – नितीन वाळके

मालवण, दि. १६ मार्च

महाराष्ट्र शासनाचा जादूटोणा विरोधी कायदा जनतेला समजणे आवश्यक आहे. हा कायदा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविला तरच श्रद्धेच्या नावाखाली होणारी सर्वसामान्य जनतेची फसवणूक थांबेल, असे प्रतिपादन मालवण मधील सामाजिक कार्यकर्ते नितीन वाळके यांनी येथे बोलताना केले.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग व जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती सिंधुदुर्ग यांच्यामार्फत सुजाण नागरिकांसाठी जादूटोणा विरोधी कायदा समजून देण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी मालवण येथे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मार्गदर्शन करताना नितीन वाळके हे बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत विचारमंचावर संभाजी कोरे, संजय जाधव, रमेश जाधव, विपीन ठाकूर, विलास वळंजू आदी उपस्थित होते.

विजय चौकेकर यांनी सर्वांना शासनाच्या जादूटोणा विरोधी कायद्याचे पत्रके वाटप केली. हा कायदा देव आणि धर्म या विरोधी नसल्याचे सांगितले, तसेच कायद्याच्या बारा कलमांची सविस्तर माहिती दिली. हा कायदा सर्वांनी समजून घ्यावा. लोकांनी श्रद्धेच्या नावाखाली जादूटोणा करणारे भोंदू लोकांपासून सावध व्हावे, यासाठी शाळा, कॉलेज, गावामध्ये व्याख्यानाच्या आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून हा कायदा पोहोचवूया, असे विजय चौकेकर यांनी सांगितले.

सूत्रसंचालन संभाजी कोरे यांनी केले. तर आभार संजय जाधव यांनी मानले. यावेळी मारुती सोनवडेकर, दिलीप देवगडकर, अशोक चावरे, प्रविण साबळे आदी व इतर उपस्थित होते.