सावंतवाडी दि.१७ मार्च
पर्यावरणीय बदलामुळे आलेल्या संकटावर मात करत हापूस आंबा बाजारपेठेत येऊ लागला आहे. सध्या तो स्थानिकांना आंबट ठरला आहे. हापूस आंब्याचा दर ७०० ते १ हजार रुपये डझन आहे . त्यामुळे आंबा सर्वसामान्य ग्राहकाला सध्या आंबटच ठरला आहे.
यंदा बदलते हवामान, अवकाळी पाऊस आणि खार पडल्याने मोहर जळला तसेच थंडीचे आगमन देखील लांबले आणि थंडीच्या आगमनामध्ये देखील फरक पडल्याने झाडावर मोहर टिकला नाही. त्यामुळे यंदा आंबा लांबला आहे तसेच लवकर मोहर आलेल्या आंबा सध्या परिपक्व झाला असून तो बाजारपेठेत येत आहे. स्थानिक बाजारपेठेत आंबा ७०० ते १ हजार रुपयापर्यंत प्रति डझन असल्याने स्थानिकांना तो आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याचे बोलले जात आहे.
आंब्याची आवक सध्या वाढली आहे .आंब्याचा दर कमी झाल्यानंतर ग्राहक त्याला मोठ्या प्रमाणात पसंती देतील असे बोलले जात आहे. सावंतवाडीच्या बाजारपेठेत आंबा सकाळी मोठ्या प्रमाणात येतो आणि त्यावेळी ग्राहक हा आंबा घाऊक पद्धतीने विकत घेत असताना पहायला मिळतात. यंदा आंबा पीक सध्या तरी कमीच प्रमाणात आहे असे सांगितले जाते.