सावंतवाडी दि.१७ मार्च
रोजगार हा कळीचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत चर्चेचा ठरेल असे बोलले जात आहे.तरुणाई सध्या रोजगार च्या प्रतीक्षेत आहे. तसेच गोव्यात जाणारे तरुण – तरुणी प्रवासात अपघाती निधन किंवा अपघात झाल्याने गंभीर जखमी होत आहेत. त्यामुळे कुटुंबीय चिंताग्रस्त बनले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराची साधने कमीच असल्याने गोवा, मुंबई ,पुणे, कोल्हापूर, बेळगाव अशा शहरांमध्ये रोजगारासाठी तरुण तरुणींना जावे लागत आहे आणि त्यामुळे कुटुंबीय कायमच काळजीत असतात. सकाळी घराबाहेर पडलेला तरुण – तरुणी परत येईपर्यंत त्यांच्या डोळ्यासमोर काळजी असते.
गेल्या काही दिवसापासून गोव्यात नोकरीत निमित्त जाणारे तरुण – तरुणींचे अपघात होत आहेत, काहीजण त्यामध्ये ठार झाले असून काही जखमी झाले आहेत. जखमी झालेले तरुण-तरुणी हे मोठ्या विवंचनेत आहे. त्यामुळे रोजगार हा कळीचा मुद्दा बनला असून अनेकांनी घोषणा केल्याप्रमाणे रोजगार उपलब्ध झालेला नाही. आडाळी या दोडामार्ग तालुक्यातील एमआयडीसी मध्ये रोजगार निर्माण होईल अशा घोषणा होत असताना अजूनही रोजगार निर्माण करणारे प्रकल्प तेथे आले नाहीत. सावंतवाडी शेजारील माजगाव या ठिकाणी सहकारी तत्त्वावर उद्यमनगर आहे तेथे राजकीय नेतेमंडळींनी डोळेझाक केली. माजगाव उद्यमनगर मध्ये काही पायाभूत सुविधा दिला असत्या तर काही प्रमाणात रोजगाराची साधने वाढली असती. मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे.
रेडी बंदर विकसित करण्यासाठी खाजगी विकासाला देण्यात आले. या ठिकाणी पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन नऊ जेटी उभारण्यात येणार होत्या. परंतु गेल्या काही वर्षापासून या बंदराचा विकास झाला नाही. मात्र ज्यांनी विकासक म्हणून हे बंदर ताब्यात घेतले. त्यांचा मात्र विकास झाला असे बोलले जात आहे. आरोंदा किरणपाणी या ठिकाणी जेटी उभारण्यात येणार होती. पण ती उभारण्यात आलेली नाही किंवा त्या जेटीला स्थानिकांचा विरोध झाल्यामुळे आता जेटी उभारण्यात येणार नाही. त्यांनी गाशा गुंडाळला असल्याचे बोलले जात आहे.
या ठिकाणी अनेक उद्योजक, परप्रांतीयांनी जमिनी विकत घेऊन रोजगार देण्याची स्वप्न दाखवली. मात्र ही स्वप्ने नुसती भंगली आहेत. उत्तम स्टील नावाचा प्रकल्प सातार्डा येथे उभा राहणार होता.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिकांच्या कवडीमोल भावाने जमिनी विकत घेतल्या .पण उषा इस्पात नंतर उत्तम स्टील प्रकल्प उभा राहिला नाही. त्यामुळे प्रकल्पात रोजगार निर्माण झाला नाही किंवा ही जमीन विकसित झालेली नाही. राजकीय पातळीवर उत्तम स्टीलच्या बाबतीत बोटचेपी भूमिका घेताना राजकीय नेते दिसत आहेत. उत्तम स्टील उद्योगा बाबतीत अवसान गळल्याप्रमाणे राजकीय नेते वावरत आहेत त्यामुळे उत्तम स्टील प्रकल्प विकसित होऊ शकला नाही याबाबत स्थानिकांमध्ये नाराजी आहे.
रोजगार निर्माण करणारे अनेक प्रकल्प येणार म्हणून घोषणा झाल्या मात्र प्रत्यक्षात कृती किंवा अंमलबजावणी झाली नसल्याने तरुण तरुणांची स्वप्न भंगली असून रोजगार मिळेल तेथे तरुण धावत आहेत आणि यावेळी अपघातामध्ये बळी पडत आहेत त्यामुळे कुटुंबीय त्रस्त असून रोजगाराचा मुद्दा कळीचा ठरेल, असे बोलले जात आहे.