शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंचे तरी योगदान काय?

शंकराचार्यांचा अपमान करणाऱ्या नारायण राणेंवर भाजपा काय कारवाई करणार?

सावंतवाडी,दि.१५ जानेवारी 
अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अजून पूर्ण झालेले नसतानाही भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई झाली आहे. हिंदू धर्मातील सर्वोच्च असलेल्या शंकराचार्यांनीही अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे आहे असे स्पष्ट केले आहे. परंतु भाजपाचे लोक शंकराचार्यावरच तोंडसुख घेऊ लागले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यात एक पाऊल पुढे टाकत शंकराचार्यांचे योगदान काय? असा प्रश्न विचारून शंकराचार्य व हिंदू धर्माचा अपमान केला आहे म्हणून आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने नारायण राणे यांचा वक्तव्याचा निषेध करतो,असे सिंधुदुर्ग काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी जेष्ठ नेते प्रदेश प्रतिनिधी विकास सावंत, सचिन वंजारी, विभावरी सुकी, अँड राघवेंद्र नार्वेकर, अमोल सावंत, श्री परब आदी उपस्थित होते.

शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या श्री. नारायण राणे यांचे तरी राम मंदिरसाठी योगदान काय? केंद्रीय मंत्री नारायण हे राजकीय स्वार्थासाठी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये व काँग्रेसमधून भाजपात गेले आहेत. भाजपात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्याशिवाय पर्याय नाही म्हणूनच मोदींसाठी हिंदू धर्माच्या सर्वोच्च पदावरील शंकराचार्य यांनाच तुमचे योगदान काय? असा सवाल विचारून त्यांनी सर्व मर्यादा पार केल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

प्रभू श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात कारण त्यांनी आयुष्यात कुठेही मर्यादेची उल्लंघन केले नाही, ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान केला नाही. श्रीराम यांना सत्ता चालून आली असतानाही त्यांनी त्या सत्तेचा त्याग करुन १५ वर्ष वनवासात घालवली. अशा मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या मंदिरासाठी शंकराचार्यांवर तोंडसुख घेणारे नारायण राणे सारखे लोक हिंदू धर्म भ्रष्ट करत असून हे लोकच हिंदु धर्माला कलंक आहेत. शंकराचार्यांचा अपमान करणाऱ्या नारायण राणेंवर भाजपा कधी व काय कारवाई करणार? असा प्रश्न शेख यांनी उपस्थित केला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्राणप्रतिष्ठा करुन मतांचा जोगवा मागण्यासाठी हे सर्व चालले आहे. मागील १० वर्षाताली कामांवर भाजपा मते मागू शकत नाही कारण त्यांनी लोकांना सांगावे असे काहीच केलेले नाही त्यामुळे रामाच्या नावावर मतं मागण्याचा हा खटाटोप आहे. राम मंदिरासाठी स्वतंत्र्य न्यास आहे परंतु भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा इव्हेंट बनवलेला आहे, असे त्यांनी सांगितले.