जुन्या, नव्या खेळाडूंमध्ये समनव्य साधण्याचे कार्य नवचैतन्य निर्माण करणारे – भाई गोवेकर

मालवणात स्मृतिलीला पुरस्कारांचे वितरण

मालवण, दि.१८ मार्च

हडकर कुटुंबिय व मालवण तालुका क्रिकेट असोसिशन वतीने जुन्या क्रीडापटूंचा स्मृतिलीला पुरस्कार देऊन गौरव केला जात आहे. त्याचबरोबर नवनवीन दर्जेदार क्रीडापटू घडावेत, यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. जुन्या, नव्या खेळाडूंमध्ये समनव्य साधण्याचे हे कार्य नवचैतन्य निर्माण करणारे आहे. विष्यातही असे उपक्रम वाढत जाऊन खेळाडूंना चांगले प्रोत्साहन, प्रेरणा मिळत राहो, असे प्रतिपादन भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते भाई गोवेकर यांनी मालवण येथे केले.

सकल भंडारी हितवर्धक समाज, हडकर कुटुंबीय, तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्यावतीने आणि नंदिता राजेश पाटील पुरस्कृत लीलाधर हडकर स्मृतिप्रीत्यर्थ स्मृतिलीला पुरस्कार व बॅडमिंटन स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचा सत्कार समारंभ आज सायंकाळी मालवण भरड येथील लीलांजली सभागृह येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते भाई गोवेकर, मालवणी कवी रुजारीओ पिंटो, भंडारी समाजाचे तालुकाध्यक्ष रवी तळाशीलकर, भाई खराडे, भाऊ हडकर, नंदू देसाई, महेश परब यांच्यासह हडकर कुटुंबीय व तालुका क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भंडारी समाज बांधव उपस्थित होते. प्रास्ताविक श्री. तळाशीलकर यांनी केले.

यावेळी क्रिकेटपटू सुरेश मयेकर, व्हॉलीबॉलपटू विलास सामंत, पंच व क्रीडापटू विनायक मयेकर, उदयोन्मुख क्रीडापटू पियुष वस्त, टेबल टेनिसपटू इशांत वेंगुर्लेकर, बॅडमिंटनपटू गौरव पराडकर यांना स्मृतिलीला पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याचबरोबर लीलाधर हडकर यांचे बालपणापासूनचे सहकारी आनंद तपकिरकर यांना सखा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. नुकत्याच घेण्यात आलेल्या विविध गटातील बॅडमिंटन स्पर्धेतील विजेत्यांनाही मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी रुजारीओ पिंटो, भाऊ हडकर, यशोधन खराडे यांचा सत्कार करण्यात आला.

भाई गोवेकर म्हणाले, हडकर कुटुंबीय आणि मालवण तालुका क्रिकेट असोसिएशनने हाती घेतलेला उपक्रम हा उल्लेखनीय असाच आहे. यापुढेही देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळविणारे खेळाडू येथे निर्माण व्हावेत, असेही ते म्हणाले. श्री. पिंटो यांनी सत्कारमूर्तींचे, यशस्वी बॅडमिंटनपटूंचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच मालवणी कवितांचे सादरीकरण करत उपस्थितांचे मनोरंजनही केले. यावेळी नंदू देसाई, यशोधन खराडे यांनी आपले विचार मांडले. सूत्रसंचालन अजय शिंदे यांनी केले. सचिन आरोलकर यांनी आभार मानले.