गोभी मंच्युरियन मध्ये आता “फुड कलर” नाही…

संघटनेच्या बैठकीत निर्णय; वापरणाऱ्यावर कारवाई करणार…

सावंतवाडी, दि.१८ मार्च

ग्राहकांच्या आरोग्याचे हित लक्षात घेता गोभी मंच्युरियन मध्ये फुड कलर न वापरण्याचा निर्णय गोबी मंच्युरियन संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. दरम्यान कोणताही व्यापारी कलर वापरताना आढळून आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गोभी मच्युरीयन सिंधुदुर्ग संघटनेचे अध्यक्ष वैभव घोगळे यांनी दिला आहे.
गोवा व कर्नाटक येथे परप्रांतीय विक्रेत्यांकडून गोभी मंच्युरियन मध्ये मोठ्या प्रमाणात कलर वापरण्यात येतो. हा कलर आरोग्यास हानिकारक असल्याने त्या ठिकाणी गोबी मंच्युरियन विक्री बंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ येथे झालेल्या बैठकीत संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी हा निर्णय घेतला आहे. यात ग्राहकांच्या आरोग्याचा विचार लक्षात घेता आरोग्यास अपायकारक असा कोणताही फूड कलर न वापरण्याचा एक मताने निर्णय घेण्यात आला तसेच स्थानिक किंवा विशेषतः अन्य ठिकाणावरून आलेल्या परप्रांतीय विक्रेते कलर वापरत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी एक मुखी मागणी यावेळी उपस्थित व्यावसायिक कडून करण्यात आली.
यावेळी श्यामसुंदर मालवणकर, हेमंत पांगम, मधुकर भाईडकर, अशोक कोरगावकर, दीपा पार्सेकर, अर्जुन पारकर, अश्रफ शेख, आबा धुरी, विलास नारकर, निलेश घावनळकर, विश्वास गवंडे आदी व्यावसायिक उपस्थित होते.