सावंतवाडी,दि.१८ मार्च
येथील उद्योजक राजन वामन आंगणे (६० वर्ष) यांचे आज सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते मुळचे मालवण तालुक्यातील मसुरे आंगणेवाडी येथील सुपूत्र होते. क्वाॅरी व्यवसायामुळे ते सावंतवाडी कारिवडे राहत असत. ते दानशूर म्हणून ओळखले जात. कारिवडे आणि गुहागर मध्ये
व्यवसाय होता.
उपजिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यासाठी आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. कारिवडे येथील क्वाॅरी व्यवसाय होता .पण हा व्यवसाय बंद होता. मात्र ते या ठिकाणी राहत होते.ते झोपले होते. सायंकाळी कर्मचारी उठविण्यासाठी गेला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांने ओळखीच्या कारिवडे गावातील नागरिकांना हाक मारली त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले असता मृत घोषित करण्यात आले.
राजन आंगणे यांनी अनेकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुढाकार घेतला तसेच आयुवेर्दिक महाविद्यालयाच्या संस्थेचे संचालक होते. त्यांनी या संस्थेसोबत अनेक संस्थांना आर्थिक मदत दिली होती. मालवण आणि सावंतवाडी मध्ये सामाजिक उपक्रमांत ते कायमच पुढाकार घेत. सावंतवाडी हेल्पलाईन मित्रमंडळ सुरू करून त्यांनी अनेकांना आर्थिक पाठबळ दिले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ते खंदे समर्थक होते.
मालवण येथे सन ८४-८५ च्या दशकात सिंधुदुर्ग कॉलेज स.का. पाटील मध्ये त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी मालवण जागृती पॅनलच्या माध्यमातून प्रत्येक संस्थेत यश मिळवण्याचा संकल्प केला. मालवण येथे संजय गावकर मित्र मंडळ स्थापन करून त्यांनी आरोग्य, क्रीडा, सामाजिक उपक्रम राबवण्यास सिंहाचा वाटा उचलला होता. मालवण वायरी मध्ये त्यांचे निवासस्थान होते तर कारीवडे आणि गुहागर मध्ये त्यांचा व्यवसाय होता मालवणचे आई कलावती मंदिर उभारण्यात त्यांच्या सिंहाचा वाटा होता. सावंतवाडी आणि मालवण मध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली. ते अविवाहित होते.त्यांच्या पश्चात भाऊ ,वहिनी, पुतणी असा परिवार आहे.
राजन आंगणे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजताच माजी आमदार राजन तेली,अँड दिलीप नार्वेकर,संजू परब, महेश सारंग, मनोज नाईक,राजू मसूरकर, महेश सुकी, संतोष तळवणेकर, मंगेश तळवणेकर,बाळ बोर्डेकर, जगदीश मांजरेकर,महेश कुमठेकर, सुधीर आरिवडेकर, अच्युत सावंत भोसले, संदेश परब, श्रीकांत म्हापसेकर, तसेच अनेकांनी धाव घेतली.