मालवण,दि.१८ मार्च
मालवण तालुक्यातील कालावल खाडी पात्रात हडी गावच्या किनारी कालावल पुलाच्या खाली होत असलेल्या अवैध वाळू उपशाच्या ठिकाणी आज दुपारी मालवण महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई करत वाळू उतरविण्याचे १४ दगडी रॅम्प उध्वस्त करतानाच वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटीही फोडल्या. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
कालावल खाडी पात्रात बेकायदेशीर वाळू उपसा करण्याचे प्रमाण वाढले असून याबाबत स्थानिक ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करण्यात येत आहेत. तर चार दिवसापूर्वी मसुरे खोत जुवा येथे होत असलेल्या वाळू उपसा विरोधात महिलांनी आक्रमक भूमिका घेत वाळू उपसा करणाऱ्या कामगारांना हुसकावून लावले होते. तर तळाशील तोंडावळी येथील ग्रामस्थांनीही बेकायदा वाळू उपाशा विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तळाशील येथे भेट देऊन पाहणी केली होती. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने बेकायदा वाळू उपशावर कारवाईचा बडगा उगारला आहे. आज दुपारी हडी येथे कालावल खाडी किनारी कालावल पुलाच्या खाली होत असलेल्या वाळू उपशावर महसूलच्या पथकाने धडक कारवाई केली. यामध्ये किनाऱ्यावर वाळू उतरविण्यासाठी बांधण्यात आलेले १४ दगडी रॅम्प उध्वस्त करण्यात आले. तर वाळू वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी किनाऱ्यालगत आणून जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आल्या. वायंगणी हुरासवाडी व सडयेवाडी येथेही कारवाई करण्यात आली. या कारवाईत तलाठी वसंत राठोड, आचरा मंडळ अधिकारी अजय परब, आचरा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव, सहायक पोलीस निरीक्षक महेश देसाई, पोलीस हेडकोंस्टेबल सुशांत पवार, हवालदार मिलिंद परब, सागर मासाळ, महसूलचे शेजवळ, जाधव, होमगार्ड म्हापणकर, पोलीस पाटील सुनील त्रिंबककर आदी सहभागी झाले होते.