यरनाळकर एकांकिका स्पर्धेत कोल्हापूरची ‘बिईंग अॅण्ड नथिग‘ प्रथम

वेंगुर्ला,दि.१५ जानेवारी

वेंगुर्ला येथे संपन्न झालेल्या स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत गायन समाज देवल क्लब कोल्हापूरच्या ‘बिईंग अॅण्ड नथिग‘ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकाविला. या मंडळाला रोख १० हजार आणि फिरता तसेच कायमस्वरुपी चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

बी.के.सी.असोसिएशन मुंबई पुरस्कृत व कलावलय आयोजित स्व.प्रा.शशिकांत यरनाळकर स्मृती खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा १२ ते १४ जानेवारी कालावधीत नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशिय सभागृहात पार पडल्या. या स्पर्धेत सांघिक द्वितीय-दी फोर्थ वॉल थिएटर गोव्याच्या ‘अमर अमृता‘ने द्वितीय, नाट्यशोध रत्नागिरीच्या ‘तुती‘ने तृतीय तर रंगयात्रा इचलकरंजीच्या ‘कुपन‘ने व देशभक्त रनप्पा कुंभार कोल्हापूरच्या ‘असणं – नसणं‘ने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला. यांना अनुक्रमे ७ हजार, ५ हजार व २ हजार तसेच कायमस्वरुपी चषक देण्यात आले.

वैयक्तिक बक्षिसांमध्ये दिग्दर्शन-प्रथम-अनुपम दाभाडे (बिईंग अॅण्ड नथिग), द्वितीय-साईनंद वळवईकर (अमर अमृता), तृतीय-गणेश राऊत (तुती) यांना अनुक्रमे १ हजार, ७५०, ५०० रोख व चषक देण्यात आले.

पुरूष अभिनय-प्रथम-प्रथमेश केरकर (अमर अमृता), द्वितीय-सौमित्र कागलकर (विषण), तृतीय-स्वप्नील धनावडे (तुती) यांना यांना अनुक्रमे १ हजार, ७५०, ५०० रोख व चषक देण्यात आले.

स्त्री अभिनय-प्रथम- रितिका नेने (बिईंग अॅण्ड नथिग), द्वितीय-श्रुती मोहिते (बिईंग अॅण्ड नथिग), तृतीय-साक्षी कोतवडेकर (तुती), उत्तेजनार्थ-स्नेहल बंडगर (कुपन) व वैष्णवी पै-काकोडे (अमर अमृता) यांना अनुक्रमे १ हजार, ७५०, ५०० रोख व चषक देण्यात आले.

नेपथ्य-प्रथम-अॅड.संजय राणे (अक्षरसिधू साहित्य कलामंच कणकवली-रात बातोंकी) यांना रोख ७५० आणि चषक, प्रकाश योजना-प्रथम-यज्ञेश धोंड (नक्षत्र मुंबई -पाणीपुरी) यांना रोख ७५० आणि चषक, पार्श्वसंगीत प्रथम-रोहन शेलार व पार्थ देवळेकर (नाट्यशोध रत्नागिरी-तुती) यांना रोख ७५० आणि चषक, बालकलाकार-आरव आईर (‘ढ‘ मंडळी पिगुळी-ढिमटँग ढीटँग)याला चषक देण्यात आले.

बक्षिस वितरण प्रसंगी परिक्षक आनंद म्हसवेकर, नयना आपटे,

कलावलय संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र खांबकर, उपाध्यक्ष संजय पुनाळेकर, सचिव दिगंबर नाईक, खजिनदार सुनिल रेडकर, कलावलय सदस्य प्रकाश पावसकर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी बी.के.सी.असोसिएशन मुंबई व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विशेष सहकार्य केले. तर कलावलय संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

परिक्षक नयना आपटे म्हणाल्या की, स्पर्धेमध्ये सादर होणारी एकांकिका किवा नाटक हे आपल्या जागेवर योग्यच असते. पण ब-याचदा समजूतीचा घोटाळा होतो. सादर करणा-यांनी नाटकाची संहिता समजून घेऊन ती सादर करणे गरजेचे असते. तर परिक्षक आनंद म्हसवेकर म्हणाले की, लेखकाचे म्हणणे तुम्ही कशाप्रकारे सादर करता हे दिग्दर्शकावरच अवलंबून असते. त्यामुळे एकांकिका हे टिमवर्क आहे. या स्पर्धेमध्ये चांगल्या एकांकिका पहायला मिळाल्या. कलावलयच्या उपक्रमातील हे सातत्य असेच चालू राहो अशा सदिच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशांक मराठे यांनी केले.