मंदिरात विठुराया- रुक्मिणी माता, श्री राई, श्री गणेश आणि लक्ष्मीनारायण अशा देवदेवतांच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात पार

कट्टा येथील श्री विठ्ठल- रखुमाई, राई व लक्ष्मीनारायण मंदिरात सुरू असलेल्या जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा

मालवण,दि.२० मार्च

गेले दोन दिवस कट्टा येथील श्री विठ्ठल- रखुमाई, राई व लक्ष्मीनारायण मंदिरात सुरू असलेल्या जीर्णोद्धार आणि कलशारोहण सोहळा हजारो हरी भक्तांच्या उपस्थितीत सुरू झाला असतानाच आज तिसऱ्या दिवशी या मंदिरात विठुराया- रुक्मिणी माता, श्री राई, श्री गणेश आणि लक्ष्मीनारायण अशा देवदेवतांच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला

गेले तीन दिवस कट्टा नगरी येथे श्री विठ्ठल रखुमाई व लक्ष्मीनारायण मंदिर ट्रस्ट यांच्या आयोजनाखाली श्री विठ्ठल रखुमाई व लक्ष्मीनारायण परिवार पुनः प्रतिष्ठापना सुरू असून या सोहळ्यामुळे कट्टा नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली आहे. काल श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य संस्थान मठ विद्या नरसिंह भारती, स्वामीजी संकेश्वर यांच्या हस्ते मंदिराचा कलशारोहण सोहळा पार पडला होता. आज मुख्य देवतांची पुनः प्रतिष्ठापना करण्यात आली.

देवतांच्या मूर्ती पुनः प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विठ्ठल रखुमाई मंदिरात आज सकाळपासून स्थलशुद्धी “मंहलंदेवता पूजन’, ‘तत्वन्यास होम’ मुख्य देवता प्रतिष्ठापना ‘तत्वन्यास व प्रतिष्ठापना’, ‘महापूजा’ बलिदान, पूर्णाहुती आदी विधी संपन्न झाले. यावेळी स्थापन करण्यात आलेल्या श्री विठ्ठल, रखुमाई, राई, तसेच लक्ष्मी नारायण व गणपती या देवतांच्या मूर्ती सजवून त्यांची पुरोहितांकडून विधीद्वारे मंत्रोच्चारात प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी विठ्ठल रखुमाई व राईची मूर्ती तुळशीहार, पुष्पहार व आकर्षक वस्त्रलंकार यांनी सजविण्यात आली होती. तसेच दिनकर गुराम व सौ. दमयंती गुराम या दाम्पत्याच्या हस्ते होम कुंडात मंत्रजप करण्यात आला. तसेच मंदिराबाहेर सोळखांबाची स्थापना करण्यात आली. देवतांना नैवेद्य दाखवून उपस्थित बहुसंख्य भाविकांच्या उपास्थितीत टाळ मृदंगाच्या गजरात महाआरती करून देवतांच्या चरणी साकडे घालण्यात आले. यावेळी वातावरण विठुमय होऊन भाविक विठुरायाच्या भक्तीत दंग होऊन गेले. आरती नंतर भाविकांनी देवतांचे दर्शन घेऊन तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेतला.

यावेळी अरुण गुराम, संतोष साटविलकर, अरविंद नेवाळकर, दिनकर गुराम, सौ. दमयंती गुराम, ऋषी पेणकर, सरपंच शेखर पेणकर, सुनील नाईक, विवेक नेवाळकर, राजू वाडकर, भाऊ रेवडेकर, ऍड. प्रदीप मीठबावकर, प्रवीण मीठबावकर, रवींद्र कुडतरकर, ग्रामसेवक सरमळकर ,श्रद्धा नाईक, आनंद प्रभूवालावलकर, संजय पावसकर, गणेश वाईरकर, सौ. श्वेता सावंत डॉ. हर्षद पवार, आदी व इतर उपस्थित होते.

या सोहळ्यानिमित्त सायंकाळी स्थानिक महिला धार्मिक नृत्य, रात्री जिल्ह्यातील नामांकित भजनी बुवा यांची “संगीत भजन संस्थां” “सुश्राव्य भजने” आदी कार्यक्रम संपन्न झाले.

उद्या सत्यनारायण महापूजा

गुरुवार, दि. २१ मार्च रोजी सकाळी ९.३० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. महाआरती, दुपारी १.३० वा ते ३ वा. तीर्थप्रसाद व महाप्रसाद, संध्या ६ वा. श्री देव रवळनाथ प्रसादिक भजन, फोंडा (बुवा साहिल पारकर यांचे भजन), रात्री ९ वा. श्री. वालावलकर दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्य प्रयोग सादर होणार आहे.