मालवण,दि. २१ मार्च
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यायाचा सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. जिमखाना विभागामार्फत आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धा, परीक्षा व कला क्रीडा स्पर्धामध्ये यश मिळविलेल्या ४०० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मालवण पोलीस स्थानकाचे पीएसआय श्री. आनंद पांडुरंग यशवंते, कसाल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, पीएसआय श्री. जाधव, तसेच कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावकर, संस्था सचिव चंद्रशेखर कुशे, संचालक समीर गवाणकर, संदेश कोयंडे, महादेव पाटकर, सदस्य विजय केनवडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, जिमखाना प्रमुख प्रा.डॉ. हंबीरराव चौगले, प्रा.के.के.राबते तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.
प्रारंभी हिंदी विभाग प्रमुख डॉ. हंबीरराव चौगले यांच्या “विजय तेंडुलकर और मोहन राकेश के नाटक तुलनात्मक अध्ययन” या पुस्तकाचे प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी मागील वर्षी विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर जिमखाना विभागामार्फत आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना देखील प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले. सांस्कृतिक विभागा मार्फत मुंबई विद्यापीठामार्फत आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ग्रंथालय विभागामार्फत घेण्यात आलेली बुक रिव्ह्यू स्पर्धेची प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. डी.एल.एल.इ. विभागा मार्फतही विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली. अविष्कार विभागामार्फत जिल्हा तसेच मुंबई विद्यापीठ स्तरावर यशस्वी विद्यार्थ्यांचा देखील गौरव करण्यात आला. त्याचबरोबर विज्ञान विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त घेतलेल्या वेगवेगळ्या स्पर्धांची पारितोषिके यावेळी प्रदान करण्यात आली.
यावेळी प्रभाकर सावंत यांच्या हस्ते बास्केटबॉल ग्राऊंडचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे सदस्य विजय केनवडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत बास्केटबॉल अनुदान व मंजुरी बाबत भूमिका व्यक्त केली. प्रमुख पाहुणे आनंद यशवंते यांनी विद्यार्थ्यांना करिअर घडवण्याबाबत मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ठाकूर यांनी विद्यार्थ्यांनी उमेद न सोडता सतत प्रयत्नशील रहावे व आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार द्यावा, असे मार्गदर्शन केले. संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. हंबीरराव चौगले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.प्रमोद खरात यांनी केले. आभार प्रा. के.के.राबते यांनी मानले.