दुचाकीस्वार गोविंद सारंग रस्त्यावर कोसळून त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू

मालवण, दि.२१ मार्च

मालवण येथून कुडाळच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना होबळीचामाळ येथे नेरुरपार पुलानजीकच्या गतीरोधकाचा अंदाज न आल्याने दुचाकी गतीरोधकावर उलटून आज सकाळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गोविंद पांडुरंग सारंग (वय ६४, रा. विठ्ठल मंदिर नजीक, देवबाग) हे रस्त्यावर कोसळून त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार देवबाग येथील गोविंद सारंग हे आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील सुझुकी एक्सेस दुचाकीने (क्र. एम.एच.०७ ए.क्यू. ६८५७) कुडाळ येथून मालवणच्या दिशेने येत होते. कुडाळ – मालवण मार्गावरील होबळीचा माळ येथे दुचाकी आली असता त्याठिकाणी असलेल्या गतीरोधकाचा सारंग यांना अंदाज आला नाही. त्यामुळे आहे त्याच वेगात दुचाकी गतीरोधकावर आदळून उलटल्याने सारंग हे रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.

यावेळी स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत सारंग यांना तातडीने रुग्णवाहिकेतून कुडाळ येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांकडून सारंग यांना मृत घोषित करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक यु. जे. झावरे, पोलीस हेडकॉनस्टेबल महेंद्र देऊलकर, महिला पोलीस हेडकॉनस्टेबल संप्रसा सावंत, पोलीस नाईक अविनाश गायतोंडे, चालक वेंगुर्लेकर यांनी घटनास्थळी जात पाहणी केली.