सावंतवाडी नगरपरिषदतर्फे सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर व पाणीपट्टी भरणा करण्याचे नागरीकांना आवाहन”

सावंतवाडी दि.२२ मार्च
सावंतवाडी नगरपरिषदेने मालमत्ता कर आणि नळपाणी पट्टी वसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. या दरम्यान १९० मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून २० नळपाणी कनेक्शन तोडण्यात आली आहेत. मार्च अखेरपर्यंत ही वसुली मोहीम सुरू राहणार आहे असे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी म्हटले आहे.

सावंतवाडी नगरपरिषदेकडून दि. १ जानेवारी २०२४ पासून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील मालमत्ता व पाणीपट्टी कर विशेष वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. सावंतवाडी शहरातील सर्व सुजाण नागरीकांना नगरपरिषदेकडून आवाहन करण्यात येत आहे की सर्व नागरीकांनी आपला मालमत्ता कर/पाणीपट्टी वेळेत नगरपरिषद कार्यालयात येवून किंवा वसुली पथक जेव्हा आपल्या घरी येतील तेव्हा भरणा करावी. तसेच कर भरणा केल्याची पावती संबंधीत कर्मचाऱ्याकडून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर मोहीमेअंतर्गत नगरपरिषदेचे कार्यालय दि. २३ ते २५ मार्च या सुट्टीच्या कालावधीत देखील सावंतवाडी शहरातील नागरीकांच्या सोयीसाठी कर भरणा करण्याकरीता सुरू ठेवण्यात येणार आहे.ज्या मालमत्ताधारकांनी आपला थकीत मालमत्ता कर किंवा पाणीपट्टी कर भरणा केलेला नाही अशा १९० मालमत्ता धारकांच्या मालमत्तांवर महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औदयोगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १५२ अन्वये जप्ती अधिपत्र बजावून कर वसुलीची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. तसेच थकीत नळपट्टी असणाऱ्या २० धारकांचे नळकनेक्शन खंडीत करण्यात आलेले आहे. तरी नागरीकांनी वरील प्रकारची कारवाई टाळण्यासाठी आपला मालमत्ता व पाणीपट्टी कर ३१ मार्च पूर्वी भरणा करावा असे आवाहन मुख्याधिकारी श्री. सागर साळुंखे यांनी केले आहे.