मालवण,दि.२२ मार्च
मालवण तालुक्यात पोईप येथील उत्तम यशवंत पाटील व त्यांचा मुलगा यांना शिवीगाळ करून, तसेच त्यांच्या अंगावर मातीची वीट फेकून मारून व बांबूच्या दांड्याने मारून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी संतोष यशवंत पाटील, (रा. पोईप, ता. मालवण) याची मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण श्री. एम.आर. देवकाते यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अँड. राजेंद्र व्ही.रावराणे, अँड. प्राजक्ता गावकर यांनी काम पाहिले.
दि. ७ सप्टेंबर २०१८ रोजी फिर्यादी उत्तम यशवंत पाटील व त्यांचा मुलगा (रा.-पोईप) हे दोघे त्यांच्या घराच्या पुढच्या पडवीत बसून त्यांच्या घरी असलेल्या ब्राह्मण भोजनाच्या कार्यक्रमासाठी लागणारे नारळ सोलत असताना त्यावेळी संतोष यशवंत पाटील याने त्याठिकाणी येऊन काहीही कारण नसताना उत्तम पाटील यांना शिवीगाळ करून, त्यांच्या अंगावर मातीची वीट फेकून मारून त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत केली. तसेच बांबूचा दांडा घेवून उत्तम पाटील यांच्या डोक्यावर व उजव्या हाताच्या मनगटावर मारून गंभीर स्वरुपाची दुखापत केली. तसेच उत्तम पाटील यांचा मुलगा स्वप्नील याच्या पाठीवरही बांबू मारून त्यालाही दुखापत केली, अशी फिर्याद पोलिसात देण्यात आली होती. त्यानुसार संतोष यशवंत पाटील याच्या विरुद्ध मालवण पोलीस स्थानकात भा.द .वि कलम ३२६, ३२४, ३२३, ३३७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. व तपासाअंती आरोपीविरुद्ध दोषारोप मालवण न्यायालयात पाठविण्यात आले होते. सदर केसची सुनावणी मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मालवण श्री. एम.आर.देवकाते यांच्यासमोर पूर्ण झाली. सुनावणीअंती संतोष यशवंत पाटील याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीच्या वतीने अँड. राजेंद्र व्ही.रावराणे, अँड. प्राजक्ता गावकर यांनी काम पाहिले.