विकासाची गंगा अविरत राहण्यासाठी कोकणाला केंद्रात मंत्रिपद असणं आवश्यक -मंत्री दीपक केसरकर

सावंतवाडी,दि.२५ मार्च
नारायण राणे ही केवळ व्यक्ती नसून ते केंद्रीय मंत्रिमंडळात कोकणातील मंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग सह कोकणात व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनता नक्कीच विचार करेल असे शिवसेना प्रवक्ते शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
श्रीधर अपार्टमेंट मध्ये पत्रकार परिषदेत केसरकर बोलत होते यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, रूपेश पावसकर उपस्थित होते.

ते म्हणाले,केंद्राचे अनेक प्रकल्प आज त्यांच्यामुळे सिंधुदुर्गात होत आहेत. कोकणातील विकासाची ही गंगा अविरत राहण्यासाठी कोकणाला केंद्रात मंत्री पदाची गरज आहे. आज फुशारक्या मारणाऱ्या विनायक राऊत यांना सत्तेत असतानाही केंद्रात मंत्रिपद मिळू शकले नाही. त्यासाठी तेवढं वजन असावं लागतं.त्यामुळे नारायण राणे यांना उमेदवारी मिळाल्यास येथील जनता विकासाच्या मुद्द्यावर त्यांना नक्कीच पाठिंबा देईल, असा विश्वास देखील मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.