व्यवस्थापन समितीने गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेत विचारला जाब
कणकवली दि.१५ जानेवारी(भगवान लोके)
कणकवली तालुकास्तरीय समूहनृत्य स्पर्धेत जि.प.शाळा कलमठ बाजारपेठ नं १ या शाळेच्या लहान गट व मोठा गट ही दोन्ही नृत्य प्रथम क्रमांकाच्या शर्यतीत होते. मात्र असे असतानाही त्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले असल्याचा आरोप कलमठ बाजारपेठ शाळेच्या व्यवस्थापन समितीने केला आहे.याबाबत सोमवारी गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेत जाब विचारला. शाळेच्या व्यवस्थापन समितीने न्याय न मिळाल्यास २६ जानेवारीला आंदोलन करणार तसेच शाळेतील जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्ह्यात खेळायला पाठवणार नाही असा इशारा देण्यात आला. तसेच याबाबतचे निवेदन देण्यात आले.
कलमठ बाजारपेठ शाळा नंबर एक च्या व्यवस्थापन समितीने व ग्रामस्थांनी शुक्रवारी सरपंच संदीप मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण व गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांची भेट घेतली. यावेळी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, माजी पंचायत समिती सदस्य महेश लाड, ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार, कलमठ बाजारपेठ जि. प. शाळा नंबर १ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल कोरगावकर, उपाध्यक्षा श्रृष्टी मोडक, निवृत्त केंद्रप्रमुख नंदकुमार हजारे, बाबू नारकर, रमेश पावसकर, अनिकेत कांबळी, मंथन हजारे, अनुष्का तांबे, प्रज्ञा तांबे, विद्या चव्हाण, सेजल हिंदळेकर, कीर्ती मेस्त्री, वैदेही खरात, मधुरा परब व पालक उपस्थित होते.
शाळा व्यवस्थापन समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्याच्या क्रीडास्पर्धा नियोजन सभेमध्ये ठरविले होते की, पंच हे प्राथमिक शिक्षक नेमू नयेत व स्थानिक पंच असताकामा नये. असे ठरले असतांनाही प्राथमिक शिक्षक व स्थानिक पंचांची नेमणूक करण्यात आली. त्यातील एक परीक्षक तालुक्याच्या परिसराशी संबधित होता. समूहनृत्याच्या निकालावर स्वतः गटशिक्षणाधिकारी, परीक्षक आणि संबधित शाळेचे संघव्यवस्थापक यांचा प्रभाव दिसून येतो. समूहनृत्याचे निकाल हे पूर्वनियोजितच होते असे दिसून आले. कारण पंचांची नेमणूक फक्त गटशिक्षणाधिकारी यांनी कोणालाही विश्वासात न घेता केलेली होती. तसेच आपण ज्या प्रभागाचे प्रमुख आहेत त्या प्रभागाला नृत्यमध्ये नंबर दिले जाईल अशा प्रकारच्या नियोजनामुळे आमच्या शाळेतील मुलांचे मानसिक खच्चीकरण झाले. परीक्षक स्पर्धेचा निकाल जाहीर करण्या अगोदरच स्पर्धेच्या ठिकाणावरून पळून गेले. सदर स्पर्धेचा निकाल व आमच्या नृत्यातील त्रुटी मागितल्या असता तिथे एकही पंच उपस्थित नव्हते. गेल्यावर्षी सुद्धा आमच्या शाळेवर अशाच प्रकारचा अन्याय करण्यात आला होता. शाळेकडे व मुलांकडे पूर्वग्रह दृष्टीने पाहिले जाते. हा आमच्या शाळाव्यवस्थापन समिती, विद्यार्थी, पालक व शिक्षक या सर्वावर अन्याय झालेला असून त्यांचे मानसिक खच्चीकरण झालेले आहे. आम्हाला वेळीच न्याय मिळाला नाहीतर जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेमध्ये आमच्या शाळेचे संघ लहान गट रिले मुली व लहान गट कबड्डी मुली या संघांची निवड झालेली असून सदर जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये आमचे संघ पाठवणार नाही असे म्हटले आहे. यावे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी या बाबतीत २६ जानेवारी च्या आदी सखोल चौकशी करून योग्य न्याय दिला जाईल असे आश्वासन शालेय व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांना दिले.