सावंतवाडी दि.२६ मार्च
महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व शिक्षण विभाग पंचायत समिती सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी तालुक्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आर.पी.डी.हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे करियर समुपदेशन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत विद्यार्थ्याना उपलब्ध विविध शिक्षणाच्या वाटा, विविध स्पर्धा परीक्षा त्यासाठी लागणारी तयारी या संबंधी मार्गदर्शक करण्यात आले.
यात ग्रामीण भागात शैक्षणिक व आर्थिक अडचणींवर मात करुन जिद्द व मेहनतीने पहिल्याच प्रयत्नात राज्य सेवा आयोग परीक्षेत यशस्वी झालेले प्रेरणादायी व्यक्तीमत्व व सद्या सावंतवाडी कारागृहाचे कर्तव्यदक्ष उपअधिक्षक संदीप एकशिंगे यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यातील क्लृप्त्या सांगितल्या आणि कोल्हापूर, गडहिंग्लजसह सिंधुदुर्गातील ग्रामीण भागातील मुलांना इंजिनिअर आणि डॉक्टर होण्याची स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शन करणारे यशस्वी गुरु, सुपर एकॅडमीचे संचालक अमोल पाटील यांनी जेईई (JEE),नीट (NEET) व सी.ई.टी.(CET) यासंबंधी मार्गदर्शन केले.
पंचायत समिती सावंतवाडीच्या गट शिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांच्यां मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचालन सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांनी केले तर आभार प्रसाद सांगेलकर यांनी मांडले.
याप्रसंगी आर.पी.डी. हायस्कूलचे प्राचार्य धोंड, प्रा.विलास पोळ, विठ्ठल सावंत, विविध शाळांचे विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.