विजयदुर्ग येथील ‘ कलंदर ‘ या संस्थेचे बाळा कदम लिखीत आणि दिग्दर्शित
देवगड, दि.२८ मार्च
विजयदुर्ग येथील ‘ कलंदर ‘ या संस्थेचे बाळा कदम लिखीत आणि दिग्दर्शित ‘ शेजारीण ‘ हे पहिले मालवणी नाटक रंगभूमीवर येत आहे. कलंदर संस्थेच्या वतीने गंगाराम गवाणकर लिखीत ‘ वस्त्रहरण ‘ या मालवणी नाटकाचे या संस्थेच्या वतीने हौशी रंगभूमीवर काही प्रयोग करण्यात आले. दरम्यान, बाळा कदम यांच्या ‘ छेद ‘ या मराठी नाटकाचेही हौशी रंगभूमीवर प्रयोग झाले. दुसरीकडे जिल्ह्यातील अनेक एकांकिका स्पर्धेत कलंदर संस्थेतर्फे बाळा कदम यांच्या गणपो लगीन करता, कलाम मोहारलाच नाय, उलटाच्या सुलटा, चोंबडेवाडीचे कोंबडे या मालवणी तर पालीश प्रेमाचं आणि प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं या मराठी एकांकिका सादर करण्यात आल्या आणि बक्षीसविजेत्या ठरल्या. मात्र अनेक वर्षानंतर ‘ शेजारीण ‘ हे मालवणी नाटक रंगभूमीवर येत असून यामध्ये बाळा कदम यांच्यासह रविकांत राणे, महेश चव्हाण, विजय तांबे, शरद डोंगरे, गणेश पुजारे, गणेश मिठबावकर, दिनेश जावकर, यशपाल जैतापकर, साक्षी सरवणकर, कु. रिद्धी कदम आणि प्रमुख भूमिकेत सौ. शुभा कदम काम करत आहे. या नाटकाचे नेपथ्य संदीप मेस्त्री आणि संजय सावंत, पार्श्वसंगीत रोहित राणे, प्रकाश योजना गणेश मिठबावकर यांची असून नाटकाचे व्यवस्थापक प्रसाद देवधर आहेत. कोकणच्या पार्श्वभूमीवर विनोदी आणि आशयघन अशा या दोन अंकी मालवणी नाटकाचे प्रयोग कोकणातील अनेक उत्सव आणि कार्यक्रमात सादर करण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी ९३२५६२४२४१ किंवा ९४२०८२३५१५ या नंबरवर संपर्क साधावा असं आवाहन नाटकाचे व्यवस्थापक प्रसाद देवधर यांनी केले आहे.