मोबाईलवर मेसेज द्वारे एक लिंक पाठवून १८ हजारांची फसवणूक

कणकवली दि १५ जानेवारी(भगवान लोके)

मोबाईलवर मेसेज द्वारे एक लिंक पाठवून १८ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार अविनाश शिवाजीराव राणे (५४, रा. नाथ पै नगर, कणकवली) यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे. ही घटना १९ डिसेंबर रोजी घडली.

अविनाश राणे यांच्या मोबाईलवर १९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सौरवकुमार नावाच्या अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला. तो मेसेज अविनाश यांनी उघडून पाहिला असता त्यामध्ये एक लिंक होती. ती लिंक ओपन केली असता एक ओटीपी मागितला. त्यानंतर ओटीपी दिल्यानंतर अविनाश राणे यांच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कणकवलीच्या खात्यामधील १८ हजार रुपयाची रक्कम अज्ञाताने फसवून काढून घेतली. असे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव करत आहेत.