नांदगाव सरपंच मारहाणप्रकरणी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

कणकवली दि.३० मार्च(भगवान लोके)
नांदगाव सरपंच रविराज मोरजकर व त्यांचा भाऊ भूपेंद्र मोरजकर यांना मारहाण करून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी सुरेश अर्जुन मोरये(६२) व कमलेश सुरेश मोरये (३९, दोघेही रा. नांदगाव तिठा) यांना अटक करून एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांची शनिवारी पोलीस कोठडी संपल्याने कुडाळ न्यायालयात हजर केले असता सोमवार १ एप्रिलपर्यंत आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

या गुन्ह्यातील संशयित आरोपी सराईत आहेत.त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यांमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत.आरोपींची गुन्हेगारी प्रवृत्ती आहे.या आरोपींना एक दिवस पोलीस कोठडी मिळाल्याने पूर्ण तपास झाला नाही.दोन्ही आरोपी पोलीस तपासात सहकार्य करीत नाहीत.या गुन्ह्यात आरोपींनी फिर्यादीचा घेतलेला मोबाईल जप्त करायचा आहे, त्यासाठी पोलीस कोठडीध्ये वाढ मिळावी, अशी मागणी कुडाळ न्यायालयासमोर सरकारी पक्षातर्फे केल्याने दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत वाढ देण्यात आली आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास कणकवली पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ करीत आहेत.