शिमगोत्सवात कुणकेरी येथील हुडा उत्सवाला जत्रेचे स्वरूप

सात दिवसांचा शिमगोत्सव हुडा उत्सवाने संपन्न

सावंतवाडी, दि.३० मार्च 
शिमगोत्सवात कुणकेरी येथील हुडा उत्सवाला जत्रेचे स्वरूप आले होते. या उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने मोठा प्रमाणात लहान थोर भावीक उपस्थित होते. शंभर फुटी उंच असलेल्या हुड्यावर तीन मनुष्य रूपी संचार चढले आणि त्यांच्या दिशेने भाविकांनी दगडही भिरकावले .या दरम्यान अनोखा भक्तिमय प्रसंग पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांनी गर्दी केली होती. सात दिवसांचा शिमगोत्सव हुडा उत्सवाने संपन्न झाला.

दरम्यान यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले ,माजी आमदार राजन तेली, युवराज लखनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे परब तसेच मान्यवरांनी या उत्सव स्थळी भेट घेऊन देवाचे दर्शन घेतले.

शिमगोत्सवात पारंपरिक खेळ आणि विविधांगी रूपे पहायला मिळतात. काल कवळे जाळणेचा खेळ उत्साहात साजरा केला.

कुणकेरी गावात १०० फुट उंच असलेल्या सागवान वृक्षाला हुडाचे महत्त्व आहे. या हुड्यावर तीन मनुष्य रूपी संचार (अवसार) चढले . शंभर फूट उंच असलेल्या शिखरावर पोहोचले तेव्हा भाविकांनी हातात दगड घेऊन हुड्यावर संचाराच्या दिशेने भिरकावयाला सुरूवात केली .तो थरार पाहण्यासाठी आणि व्हिडिओ वर क्लिक करण्यासाठी भक्तांना संधी मिळाली. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. शंभर फूट उंच हुड्यावर संचार चढताना भिरकावलेला दगड संचारावर बसला तर तुमचं भाग्य खुलले असं समजलं जातं. या तीन संचारातील एक संचार खाली आल्यावर दुसऱ्या संचारावर दगड भिरकावले गेले आणि तोही खाली आल्यावर शिखरावर पोहोचला तिसरा संचारावर दगड भिरकावले गेले आणि नंतर तोही संचार खाली आल्यावर हुडा उत्सव संपतो .

या सात दिवसांचा शिमगोत्सव मध्ये हुडोत्सवाचा मुख्य दिवस असून या दिवशी सकाळपासून भावई देवीच्या निवासस्थानी तसेच मंदिरात देवीची ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम झाले. दुपारी २ वाजता मांडावरून गाव रोंबाट सुटले .याचवेळी पळसदळा येथे आंबेगावच्या श्री देव क्षेत्रपाल निशाणाची भेट झाली. त्यानंतर कोलगाव सीमेवर कलेश्वर देवस्थानची निशाण भेट होऊन सर्वजण भावई मंदिराकडे आले. यानंतर हुड्याजवळ घोडे मोडणी,वाघ खेळ, देवाचा भला मोठा दगड उचलून फेऱ्या घालण्यात आल्या व लुटुपुटूचा खेळ मांडला . यानंतर हुड्यावर चढलेल्या अवसारांवर दगड मारण्याच्या पारंपरिक कार्यक्रमाने हुडोत्सवाची सांगता झाली.
हुडाउत्सव स्थळी देवाची पालखी, तरंग काठी,अवसार वाजतगाजत, फटाक्यांची आतषबाजी करत येत असताना वाटेवर झोपणाऱ्याना ओलांडून पुढे सरकत होते. या झोपणाऱ्या भाविकांच्या हिडापीडा दूर होतात अशा भावना आहेत.