अनधिकृत वेश्या व्यवसायावर वेंगुर्ला पोलिसांची धाड

२५ वर्षीय युवतीसाहित एकाला अटक

वेंगुर्ला,दि.१५ जानेवारी
वेंगुर्ला बंदर नजीक असलेल्या वामन गेस्ट हाऊस येथे छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अनधिकृत वेश्या व्यवसायावर वेंगुर्ला पोलिसांनी सापळा रचत धाड टाकली आहे. यात एका २५ वर्षीय युवती सहित वेंगुर्ला पिराचा दर्गा येथील अश्रफ इसाक मुजावर (४७) याला वेंगुर्ला पोलिसांनी अटक केली आहे.
वेंगुर्ला वेंगुर्ला बंदर येथील वामन गेस्ट हाऊस मध्ये छुप्या पद्धतीने वारंवार एक किंवा दोन युवतींना आणून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती वेंगुर्ला पोलिसांना मिळाली होती. यानुसार आज १५ जानेवारी रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या सहित वेंगुर्ला पोलिसांच्या टीमने दुपारी ३ वाजताच्या सुमारास वामन गेस्ट हाऊस वर अचानक धाड टाकली. यात मुंबई ठाणे गोवंडीनगर येथील २५ वर्षीय युवती सहित हा वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या अश्रफ मुजावर याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
दरम्यान मुंबई येथील युवतीची वैद्यकीय तपासणी करून तिला सावंतवाडी येथील अंकुर सुधारगृहात रवाना करण्यात येणार असून अश्रम मुजावर याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव, पोलीस सुरेश पाटील, अमर कांडर, पांडुरंग खडपकर, बंटी सावंत, योगेश सराफदार, दादा परब, योगेश वेंगुर्लेकर यांनी ही कारवाई केली. दरम्यान आजगाव येथील वेश्या व्यवसायावर धाड टाकल्यानंतर वेंगुर्ला पोलिसांची ही दुसरी धडक कारवाई आहे. यामुळे अनधिकृत वेश्या व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.