माळगाव भोगलेवाडी ग्रामस्थांचे २६ रोजी उपोषण

मालवण,दि.१५ जानेवारी

माळगावमधील भोगलेवाडी ग्रामस्थ मंडळ आपल्या विविध प्रलंबित विकासकामांच्या पूर्ततेसाठी दि. २६ जानेवारीला कुडाळ येथील कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार आहे. १९ डिसेंबर रोजी भोगलेवाडी आणि बालोजीवाडीच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.

२०१८-१९ मधील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम, तलाठी कार्यालय, बौद्धवाडी येथील अतिधोकादायक रस्ता, बेळणे रोड ते मठ भोगलेवाडी रस्ता, भोगलेवाडी तिठा ते बौद्धवाडी रस्ता दुरुस्ती, जलजीवन योजनेचे काम अशा एकूण सहा प्रलंबित कामांसाठी ग्रामस्थ उपोषण आंदोलन छेडणार आहेत. वरील सर्व कामांसाठी ग्रामस्थ सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नाहीय. त्यामुळे नाईलाजाने शेतीची कामे सोडून उपोषणाचा मार्ग ग्रामस्थांना उपोषण आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागत असल्याचे माळगाव भोगलेवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत रावराणे यांनी सांगितले आहे.