मालवण,दि.१ एप्रिल
मालवण शहरातील पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण असलेल्या मालवण बंदर जेटी येथील हायमास्ट टॉवर गेले काही महिने बंद असल्याने रात्रौच्या वेळी जेटी परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. बंदर जेटी परिसरात पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते. त्यामुळे या बंद हायमास्ट बाबत मालवण नगरपालिकेचे लक्ष वेधूनही हायमास्ट प्रकाशमान करण्याबाबत कोणतीही कार्यवाही नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत नसल्याचे सांगत मालवणच्या माजी नगरसेविका जयमाला मयेकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मालवण शहरातील बंदर जेटी येथील हायमास्ट टॉवर काही बंद आहे. हा हायमास्ट दुरुस्त करून पूर्ववत करण्याबाबत नागरिकांना नगरपालिकेकडे वारंवार लक्ष वेधत आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नगरसेवकांची मुदत संपल्याने ते देखील या याबाबत काही करू शकत नाहीत. परंतु घरपट्टी, पाणीपट्टी वसुल करण्यात नगरपालिका प्रशासन जास्त व्यस्त आहे. नागरिकांच्या तक्रारीकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ नाही. आता एप्रिल मे महिन्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक मालवणात दाखल होणार असून तत्पूर्वी सदर हायमास्ट टॉवर प्रकाशमान होणे गरजेचे आहे. नगरपालिका प्रशासनाला लाईट व्यवस्था करायला जमत नसेल तर पुर्वी सारख्या ट्यूबलाईट लावायला हरकत नाही, या ट्यूबलाईट चांगल्या कंपनीच्या लावण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे, असेही जयमाला मयेकर यांनी म्हटले आहे.