होळी मांडावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन,मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा

तळेरे,दि.१ एप्रिल

तळेरे येथे शिमगोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या उत्सवाची समाप्ती रविवारी रात्रौ झाली.

शिमगोत्सवात कोकणात विविध परंपरा अजूनही पहायला मिळतात. शिवाय, धार्मिक श्रद्धा आणि त्या अनुषंगाने विविध धार्मिक कार्यक्रमही परंपरेनुसार विविध ठिकाणी या दरम्यान भक्तिभावाने केले जातात. तळेरे येथील होळी चव्हाट्यावर श्री देव गांगेश्वर आणि खर्जादेवीची पालखी आणि इतर देवता स्थानापन्न होतात. या काळात अनेक माहेरवाशिणी देवीची ओटी भरण्यासाठी आणि होलीसमोर नतमस्तक होण्यासाठी येतात. तर गावातील सर्व मंडळी याठिकाणी देवतांसमोर नतमस्तक होतात.

या दरम्यान श्री गांगेश्वर प्रासादिक नाट्य मंडळ तळेरे गावठाण यांच्या वतीने होळी मांडावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये गावातील अनेक शालेय मुलांनी आपल्यातील कलाविष्कार सादर केलेत. हे कार्यक्रम दोन दिवस चालले. त्याशिवाय, यावेळी प्रबोधनात्मक एकांकिका सादर करण्यात आल्या.

तर राठीवडे (ता. मालवण) राठीवडेकर यांच्या दशावतार नाट्य प्रयोग झाला. यावेळी गावच्यावतीने सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी सूर्यकांत तळेकर, देवस्थानचे मानकरी उदय तळेकर, विश्वजित तळेकर,प्रकाश घाडी, दशावतार नाट्य मंडळाचे प्रमुख श्री.मेस्त्री, आदर्श व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण वरुणकर यांचा शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू जठार यांनी केले. या सर्व कार्यक्रमांना रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर शेवटच्या दिवशी सकाळपासून ग्रामस्थांनी ओटी भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. त्यानंतर गाऱ्हाणी झाली आणि रंगपंचमीने शिमगोत्सवाची सांगता झाली.