भाजपने नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणारही – केंद्रीय मंत्री नारायण राणे

माझ्या नेत्यांना मी तिकीट द्या, असं बोलायला गेलेलो नाही ; दहीकाल्यात शंकासुर कोण असणार? राणेंचा टोला

कणकवली दि.२ एप्रिल(भगवान लोके)

सिंधुदुर्ग – रत्नागिरी मतदारसंघात भाजपाची ताकद आहे. भाजपाच हा मतदारसंघ लढणार हे निश्चित आहे,मात्र उमेदवार कोण असेल हे पक्ष ठरवणार आहे. यामध्ये कोणीही लुडबुड करु नये, मी नाव मागे घेतलेलं नाही. मी कुणाशी बोलायला देखील गेलेलो नाही. माझ्याही नेत्यांना मी तिकीट द्या असं बोलायला गेलेलो नाही. या मतदारसंघात भाजपाने माझं नाव जाहीर केल्यास मी निवडणूक लढणार आणि मी जिंकणारही असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वेक्त केला.दहीकाल्यात शंकासुर कोण असणार? असा टोला राणेंनी लगावला आहे.मुंबई येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत आपल्या पक्षाची बैठक बोलावली आहे,याबाबत पत्रकारांनी राणेंचे लक्ष वेधले असता त्यावेळी ना.राणेंनी प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे. आम्ही पण उद्या भजपाची बैठक बोलावली आहे. मी पण जिल्ह्यात चाललो आहे. आमच्याकडे कोकणात गावागावात दहीकाला होतो, तसा तो उदय सामंत यांच्याकडे व आमच्याकडे होणार आहे.पण या दहीकाल्यात शंकासुर कोण असणार? हे मला माहिती नाही असा टोला नारायण राणे यांनी लगावला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपाच्या सगळ्या नगरपालिका, जिल्हा बँक, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था या भाजपाकडे आहेत. ही आमची भाजपाची ताकद असताना आम्ही हा मतदारसंघ सोडणार का? असा सवाल त्यांनी केला. यावेळी राणेंनी उदय सामंत यांचा उमेदवार कोण? त्याचं मला नाव सांगा असा सवाल करताच पत्रकारांनी किरण सामंत हे इच्छुक उमेदवार असल्याचे सांगितले. त्यावर राणेंनी “अरे बापरे” करत हात जोडले. परंतु त्यांच्या नावाला माझा विरोध नाही. परंतु येथे भाजपाचा उमेदवार असेल असा दावा नारायण राणे यांनी केला.तसेच किरण सामंत यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल उद्या विचारा,रत्नागिरीत बोलतो,असेही त्यांनी सांगितले.