देवगड हायस्कूल मध्ये भूगोल दिन साजरा.

देवगड,दि.१६ जानेवारी
देवगड येथील शेठ म.ग.हायस्कूलमध्ये भूगोल विषय समितीमार्फत भूगोल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक महादेव घोलराखे आणि पर्यवेक्षक सुनील घस्ती यांच्या शुभहस्ते भूगोलाच्या अभ्यासाची महत्त्वाची साधने असलेली पृथ्वीगोल आणि नकाशा यांचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेतील विज्ञान शिक्षक सागर कर्णिक यांनी लिहिलेले भूगोल गाणे संगीत शिक्षक प्रसाद शेवडे आणि उमेश कोयंडे यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी सातवी मधील स्नेहा नागरगोजे हिने भूगोल दिना बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. भूगोल विषय समितीमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी ते सातवी साठी घोषवाक्य स्पर्धेमधील तसेच इयत्ता आठवी ते दहावी साठी घेतलेल्या निबंध स्पर्धेमधील व समितीमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता सहावी ते दहावी मधील विद्यार्थ्यांसाठी’ भूगोल प्रज्ञाशोध’ या सर्वांमधील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रके देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक महादेव घोलराखे त्यांनी सर्वांना भूगोल दिन आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे निवेदन समिती प्रमुख प्रवीण खडपकर तर आभार ज्ञानेश्वर कुंभरे यांनी व्यक्त केले.