लोकसेवा समितीचे कार्य निश्चितच कौतुकास्पद! –सुरेश ठाकूर

आचरा,दि.१६ जानेवारी(अर्जुन बापर्डेकर)
डोंबिवली पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, पण डोंबिवली ही सांस्कृतिक नगरीं आहे. महाराष्ट्रभर माझे अनेक सत्कार झाले, पण आमच्या पालकमंत्र्यांच्या डोंबिवलीत प्रचंड जनसागरासमोर होत असलेला हा माझा मोठा सन्मान आहे. याप्रसंगी मी तमाम डोंबिवलीकराना साष्टांग दंडवत घालतो. रामायणात हनुमंताने द्रोणागिरी पर्वत उचलून आणल्याची कथा आहे. इथे लोकसेवा समितीने अख्खा कोकणच उचलून आणला आहे की काय, असा मला प्रश्न पडला आहे. लोकसेवा समितीच्या सामाजिक -सांस्कृतिक कार्याने मी भारावून गेलो आहे. लोकसेवा समितीचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे, असे गौरवोदगार सुरेश ठाकूर यांनी काढले.
लोकसेवा समितीच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य कोकण महोत्सवात यंदाचा लोकसेवा पुरस्कार शिक्षण-साहित्य आणि पत्रकारिता यासाठी
सुरेश शामराव ठाकूर यांना देण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. आपणास मिळालेला हा पुरस्कार मी साने गुरुजी कथामालेचे संस्थापक प्रकाशभाई मोहाडीकर यांना समर्पित करतो. लोकसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष आत्माराम नाटेकर यांचे चौफेर व्यक्तिमत्व आणि उत्कृष्ट नियोजन याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. प्रकृती ठीक नसतानाही रामचंद्र आंगणे यांनी मला सांभाळून आणल्यामुळेच मी येथे येण्याचे धाडस केले, त्यांचे आभार मानलेले त्यांना आवडणार नाही.
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण, अध्यक्ष रामचंद्र परब, उपाध्यक्ष विवेकानंद बागवे, सचिव विजय साईल यांच्या हस्ते सुरेश ठाकूर यांना मानपत्र, शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि 5 हजार रुपयांचा धनादेश समारंभपूर्वक देण्यात आला.
सुरेश ठाकूर यांच्या हस्ते
यंदाचा सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार अनिल रंगनाथ परब आणि सौ. अस्मिता आत्माराम नाटेकर यांना देण्यात आला.याप्रसंगी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे उपस्थित होते. आत्माराम नाटेकर यांनी गौरवपत्राचे वाचन आणि कर्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.