कुडाळ,दि.१६ जानेवारी
ग्राम सडकच्या भोंगळ कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी ठाकरे सेनेचे आ. वैभव नाईक यांच्यासह जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, सुशांत नाईक या वरिष्ठ पदाधिकार्यांनी सोमवारी दुपारी ग्राम सडकच्या कार्यालयात धडक देत रेंगाळलेल्या कामाबाबत जाब विचारला.
तीव्र आंदोलन करीत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंतप्रधान ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन ३१८ कोटी रूपयाचा निधी आला. त्या मंजुर निधींची निविदा प्रक्रिया सुध्दा पार पडली. मात्र त्यातील कामे संबंधित यंत्रणेच्या वतीने का सुरू करण्यात आली नाहीत? असा सवाल ठाकरेंच्या शिलेदारांनी पंतप्रधान ग्रामसडक योजना विभागावर धडक देत उपअभियंता आर. पी. सुतार यांना केला. यावेळी श्री. सुतार यांनी याबाबत आपण अधिक्षक अभियंत्यांशी बोला अशी विनंती केली. यावेळी आ. वैभव नाईक यांच्यासह ठाकरेंच्या प्रमुख शिलेदारांनी मोबाईलवरून अधिक्षक अभियंता तुषार बुरूड यांच्याशी संवाद साधत येत्या २५ जानेवारीपर्यंत निविदा झालेली कामे सुरू करा अन्यथा २७ जानेवारीला कुडाळ येथील पंतप्रधान ग्रामसडक योजना विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा निर्वाणिचा इशारा दिला आहे