कार्यारंभ आदेश झालेली कामे सुरू करण्यास आचारसंहितेचा बागुलबुवा!

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चालढकल

सावंतवाडी दि. ५ एप्रिल 

आचारसंहितेचा बागुलबुवा करत सार्वजनिक बांधकाम खाते कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) दिलेली काम सुरू करण्यास अडचणी सांगत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान एक महिन्यावर पाऊस येऊन ठेपला असून ही काम वेळेवर झाली नाही तर पुढे ४ ते ५ महिने पावसाळ्यात थांबावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
निवडणूक आचारसंहितेच्या तोंडावर मंजूर झालेली कामे आणि कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर ) दिलेली कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते आचारसंहितेचा बागुलबुवा करत आहे त्यामुळे मंजूर झालेली किंवा कार्यारंभ आदेश दिलेल्या कामांना अडथळा निर्माण झाला आहे. ठेकेदारांनी वास्तविकता ही कामे सुरू करायला हवीत तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने कार्यारंभ आदेश दिल्याने कामे सुरू झाली असल्याचे निवडणूक विभागाला कळवायला हवे होते .मात्र अधिकारी वर्गाकडून आचारसंहितेचा बागुलबुवा करण्यात येत आहे.
लोकप्रतिनिधी, मंत्री यांच्या वतक नसल्यानेच नोकरशाही विकास कामांमध्ये अडथळे निर्माण करत आहे. यावर जिल्हा सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन आढावा घ्यावा आणि कामे सुरू करावीत अशी मागणी होत आहे.
येत्या दि.७ मे ला मतदान होणार आहे तर दि.४ जूनला मतमोजणी होणार आहे त्यामुळे आचारसंहितेचा बागुलबुवा नोकरशाहीने केला तर विकास काम ठप्प होणार आहे . या मंजूर झालेली कोट्यावधी रुपयांची विकास कामे रखडली जातील. त्यानंतर पुढील चार ते पाच महिने पावसाचा कालावधी असल्याने विकास कामे ठप्प राहतील.यासाठी कार्यारंभ आदेश दिलेल्या कामाबाबत लोकसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गंभीरपणे घेऊन कामे सुरू करण्याचे निर्देश दिले पाहिजेत.
आचारसंहिता बागुलबुवा करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अनेक कामे घेतलेल्या ठेकेदारांची पाठराखण करत असल्याचे बोलले जात आहे.