मालवण,दि.५ एप्रिल
मालवण येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलने यावर्षीपासून एक आगळावेगळा नवोपक्रम हाती घेतला असून मालवणच्या कलासक्त भूमीत उपजलेल्या मुलांना शाळेतच संगीताचे धडे मिळणार आहेत, अशी माहिती प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण वळंजु यांनी दिली.
मालवणातील सांस्कृतिक वारसा पाहता इथल्या भावी पिढीला शास्त्रोक्त तबलावादनाचे धडे शाळेतच दिले तर शालेय शिक्षणाबरोबर एखादी कला विद्यार्थ्यांच्या अंगी बाणली जाईल आणि ही कला भविष्यात त्यांच्या उपजीविकेचे साधनही होऊ शकेल. येत्या दि. १८ एप्रिल पासून सुरू होणाऱ्या या संगीत वर्गाला तबलावादनसाठी टोपीवाला प्राथमिक शाळेकडे शिक्षक म्हणून कार्यरत असणारे तबला उपांत्य विशारद सुधीर गोसावी हे मार्गदर्शन करणार आहेत. या संगीत उपक्रमासाठी प्रशालेत अनंत संगीतशाला असे खास दालन निर्माण करण्यात आले आहे. या संगीत शालेत तबला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांना बसविण्यात येणार आहे. त्यामुळे तबलावादनाचे प्रशिक्षण, प्रशस्तीपत्र विद्यार्थ्यांना मिळू शकेल. इयत्ता दहावी शालांत परीक्षेसाठी हे तबलावादनाचे गुण एकूण गुणवत्तेत धरले जातात. म्हणजेच कला, गुणवत्ता वाढ, उपजीविका असा तिहेरी फायदा या संगीत शिक्षणाने होणार आहे अशी माहितीही श्री. वळंजू यांनी दिली.