रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच बॅलेट पेपर वर कमळ आणि मशाल चिन्ह?

मात्र हात, घड्याळ, तुतारी, रेल्वे चिन्ह दिसणार नाही.लढत भगव्यातच होईल हे निश्चित

सावंतवाडी दि.६ एप्रिल (अभिमन्यू लोंढे)
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमळ आणि धनुष्यबाण यापैकी बॅलेट पेपर वर कोण जागा घेणार? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. मात्र पहिल्यांदाच मशाल चिन्ह बॅलेट पेपर वर दिसेल हे नक्की झाले आहे.
मात्र हात, घड्याळ, तुतारी, रेल्वे चिन्ह दिसणार नाही.लढत भगव्यातच होईल हे निश्चित झाले आहे
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजप, शिवसेना आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात राहण्यासाठी शक्ती प्रदर्शन करत आहेत. शिवसेनेत फोडाफोडी झाली असल्याने धनुष्य बाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे तर मशाल उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडे चिन्ह आले आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून खासदार विनायक राऊत हे धनुष्य बाण चिन्हावर दोन टर्म विजयी झाले आता ते शिवसेनेतील फोडाफोडी मुळे मशाल चिन्ह घेऊन रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच मशाल चिन्ह बॅलेट पेपर वर दिसेल.
शिवसेनेचा धनुष्य बाण कि भाजपचे कमळ फुलवायचे हे अजून जाहिर झाले नाही पण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच कमळ चिन्हाला संधी मिळेल अशी राजकीय समीकरणे असल्याचे बोलले जात आहे. धनुष्य बाण चिन्हावर निवडणूक लढवावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत हे प्रयत्न करत आहेत आणि उमेदवार किरण सामंत असतील असे घोषित केले आहे तर कमळ निशाणी वर निवडणूक लढण्याची घोषणा झाली तर केंद्रीय मंत्री नारायण राणे उमेदवार असतील असे बोलले जात आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यंदा हात, घड्याळ,तुतारी, रेल्वे इंजिन ही चिन्हे दिसणार नाहीत. भगवा झेंडा फडकावचा म्हणून भाजप, शिवसेना, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना घोषणा करत आहेत. त्यामुळे कमळ कि धनुष्य बाण आणि मशाल चिन्ह बॅलेट पेपर वर झळकेल ? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
राजकीय समीकरणे आणि चर्चा पाहता तसेच राजकीय हवाल्याने बऱ्याच टर्म नंतर धनुष्य बाण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विश्रांती घेईल अशी चर्चा आहे. आतापर्यंत धनुष्य बाण चिन्हावर लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, विनायक राऊत यांनी संसदेत जाण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. मात्र आता विनायक राऊत यांना मशाल चिन्ह बॅलेट पेपर वर घ्यावं लागलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या धनुष्य बाण चिन्हावरील उमेदवार किरण सामंत यांना उमेदवारी मिळाली नाही तर पहिल्यांदाच भाजपच्या कमळ चिन्हावर उमेदवारी मिळेल तीही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या रूपाने असेल असे बोलले जात आहे. या मतदारसंघात भाजपाचे कमळ पहिल्यांदाच बॅलेट पेपर वर दिसेल का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमळ फुलवायचे का? धनुष्य बाण ताणायचा हे अजून ठरले नाही मात्र मशाल घेऊन विनायक राऊत यांनी मतदारसंघात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. आता सर्व भगव्या पताका खांद्यावर घेऊन मतांचा जोगवा मागतील हे नक्की झाले आहे.