श्रीराम वाचन मंदिर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापनशास्त्र पदविका अभ्यासक्रमातर्फे आयोजित एक दिवसीय डिजिटल मीडिया वर्कशॉप
सावंतवाडी,दि.१६ जानेवारी
आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाने तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. लिखाणाबरोबरच आपल्याला डिजिटल माध्यमात व्यक्त होण्याची गरज आहे. कारण या माध्यमाची पोच आज वाढली आहे. लाखो लोक मोबाईलचा वापर करतात. त्यामुळे आपण तंत्रज्ञानाची माहिती घेऊन त्या माध्यमातून आपल्याला जी मांडणी करायची आहे, ती योग्यरितीने केल्यास त्यातून आपल्याला जे साध्य करायचे आहे, ते साध्य होऊ शकते. आज तंत्रज्ञान सेकंदागणिक बदलत आहे. त्यामुळे आपण अपडेट झाले पाहिजे. तंत्रज्ञान जेवढे प्रगत आहे तेवढा आशयही महत्वाचा आहे. भाषाशैलीही महत्वाची आहे, असे प्रतिपादन श्रीराम वाचन मंदिरचे सहकार्याध्यक्ष डॉ. जी. ए. बुवा यांनी येथे केले.
श्रीराम वाचन मंदिर येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापनशास्त्र पदविका अभ्यासक्रमातर्फे आयोजित एक दिवसीय डिजिटल मीडिया वर्कशॉपमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, अभ्यासक्रमाचे केंद्र संयोजक राजेश मोंडकर, मार्गदर्शक आणि पत्रकार, अँकर रश्मी नर्से-जोसलकर, व्हिडिओ एडिटर नितीन जोसलकर, अँकर गौरीश आमोणकर, अँकर जुईली पांगम, विद्या राणे-सामंत आदी उपस्थित होते. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रसाद पावस्कर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.
आजच्या डिजिटल युगात प्रत्येकजण मोबाईलवर काही ना काही प्रतिक्रिया टाकत असतो. या व्यक्त होण्याला तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर डिजिटल युगात तुम्हाला खूप मोठी संधी आहे, असे प्रतिपादन प्रसाद पावसकर यांनी यावेळी केले.
प्रास्ताविक राजेश मोंडकर यांनी केले. यावेळी रश्मी नर्से-जोसलकर यांनीही मार्गदर्शन केले. स्वागत आणि सूत्रसंचालन विद्या राणे-सामंत यांनी केले. या कार्यशाळेत रश्मी नर्से यांनी क्रिफ्ट रायटिंग, अँकरिंग तसेच स्पॉट रिपोर्टिंग याबाबत माहिती दिली. तर नितीन जोसलकर यांनी एडिटिंगविषयी सविस्तर बारकावे सांगितले. एडिटिंग हा सर्वात महत्वाचा भाग असून त्यामध्ये कौशल्य महत्वाचे आहे आणि हे कौशल्य अनुभवातून साध्य करता येते. त्यामुळे प्रत्येकाने दिवसागणिक काही व्हिडिओ पाहण्याबरोबरच एडिटिंगचा प्रयत्न केला पाहिजे, असे ते म्हणाले.
गौरीश आमोणकर यांनी यावेळी आपला अँकर म्हणून झालेला प्रवास कथन केला. मुंबईसारख्या मायानगरीत जाऊन आपल्याला जे जमले नाही, ते गोव्याच्या भूमीत मला जमले आणि या क्षेत्रातील प्रत्येक दिवस आज माझ्यासाठी वेगळा असतो. त्यातून नवनवे व्हिडिओ बनवितो. माझ्या मातीतील व्हिडिओ लोकांना आवडतात. हेच माझे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अँकर जुईली पांगम यांनी स्वरसाधनेविषयी माहिती दिली. आवाजातील चढउतार, सादरीकरणाची शैली तसेच आपला आजवरचा झालेला प्रवास याबाबत त्यांनी माहिती दिली. आवाजी साधना ही खूप गंभीरतेने घेण्याची गोष्ट असून जेवढे तुम्ही कष्ट घ्याल तेवढे अधिक फळ मिळेल. अँकरिंग करताना आपल्याला सतत दक्ष रहावे लागते. भाषाशैली महत्वाची आहे. त्यासाठी सराव महत्वाचा असल्यो सांगितले.
रश्मी नर्से यांनी आपल्या अठरा वर्षाच्या प्रवासातील महत्वाचे मुद्दे कथन केले. पत्रकारांसाठी प्रत्येक दिवस महत्वाचा असतो. कोणत्याही क्षणी तुम्हाला आळस करून चालत नाही. काम टाळून चालत नाही, याची जाणीव या क्षेत्रात येणाऱयांनी ठेवली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. या कार्यशाळेत जिल्हाभरातून प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. प्रशिक्षणार्थींमधून अल्फ्रेड फर्नांडिस, हरिहर वाटवे, रामदास पारकर यांनी मनोगत व्यक्त केले. आभार विद्या राणे-सामंत यांनी मानले.