कोळंब येथील देव खापरेश्वर वाचनालय व ग्रंथालयाचा १३ वा वर्धापन दिन हनुमान मंदिर, टेंबवाडी येथे उत्साहात साजरा

मालवण,दि.६ एप्रिल

कोळंब येथील देव खापरेश्वर वाचनालय व ग्रंथालयाचा १३ वा वर्धापन दिन तेथील हनुमान मंदिर, टेंबवाडी येथे उत्साहात साजरा झाला. सकाळी कोळंब ग्रामपंचायत येथे ग्रंथ दिंडीचे पूजन सरपंच सीया धुरी यांनी केले. ग्रंथदिंडीचे उद्घाटन श्रीफळ वाढवून उपसरपंच विजय नेमळेकर यांनी केले.

वाचनालयाची ग्रंथदिंडी कोळंब ग्रामपंचायत ते हनुमान मंदिर अशी निघाली. ग्रंथदिंडीत कोळंब ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद शाळांनी भाग घेतला. शाळेतील मुलामुलींनी विविध प्रकारची वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष्य वेधले होतेः नारदमुनी, श्री राम, वारकरी शेतकरी, नऊवारी साडीमध्ये छोट्या मुली मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवित होत्या. अतिशय शिस्तबद्ध निघालेल्या ग्रंथदिंडीत सरपंच, उपसरपंच, आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स, नर्स, आरोग्यसैबिका, अंगणवाडीसेविका, मुले-मुली, शिक्षक वर्ग, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक संघ कोळंबचे सदस्य दिंडीत सहभागी झाले होते.

प्रमुख पाहुण्या म्हणून साहित्यिक मेघना जोशी यांचा हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे व पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन फित कापून झाले. स्वागत पुरुषोत्तम भोजने यांनी केले. प्रास्ताविक लाड यांनी केले.

कातवड शाळेचे शिक्षक अंकुश कणेरकर यांनी वाचनालयाच्या प्रगतीत कार्यकारिणी सदस्यांचे अथक परिश्रम असल्याचे सांगून कार्याचे कौतुक केले. सरपंच सीया धुरी यांनी’ असेच सहकार्य भविष्यातही करावे, अशी विनंती करून वाचनालयाला शुभेच्छा दिल्या.

सामाजिक कार्यकर्ते संदीप भोजने यांनी वाचनालयाच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी प्रसिद्ध साहित्यिक आना पेडणेकर यांची माहिती दिली. त्यांनी लिहिलेल्या काही प्रसिद्ध कादंबरींचा उल्लेख केला. ग्रामपंचायत सदस्य विशाल फणसेकर यांनी वाचनालयाला शुभेच्छा दिल्या. शरद लोके यांनी शाळेतील मुलामुलींच्या व्यासपीठ धाडसाचे कौतुक केले.

मेघना जोशी म्हणाल्या, माझ्यासमोर आज प्रत्येक – वयोगटातील श्रोते आहेत. त्यात बालकही आहेत व आजोबासुद्धा. त्यामुळे माझे विचार मांडताना मला विशेष आनंद होत आहे. मोबाईल, टीव्ही, सामाजिक माध्यमांच्या जगात वाचन करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक आई-वडिलांनी मुलांना लहानपणापासूनच वाचनाची सवय लावली पाहिजे. तरच वाचन संस्कृती टिकणार आहे. अध्यक्षीय भाषणात वाचनालयाचे अध्यक्ष सुनील फाटक यांनी वाचनालयाने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. पूनम लाड यांनी आभार मानले.