हडी येथे कोळंबीची चोरी; चौघांवर गुन्हा दाखल

मालवण,दि.०६ एप्रिल

मालवण तालुक्यातील हडी गावकरवाडी येथील संजय महादेव मांजरेकर यांच्या कोळंबी प्रकल्पातील कोळंबी चोरून नेल्याप्रकरणी सर्जेकोट येथील चार जणांवर मालवण पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत संजय मांजरेकर यांनी मालवण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संजय मांजरेकर यांच्या कोळंबी प्रकल्पात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास शंकर अशोक मुंबरकर, अनुज संजय आडकर, तन्मय राजेंद्र मुंबरकर व मानस बाबू आंबेकर (सर्व रा. सर्जेकोट) हे चारजण घुसले होते. संजय मांजरेकर हे नेहमीप्रमाणे प्रकल्पाच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले असता त्यांना ते सापडून आले. चौघेजण कोळंबी घेऊन पळत असताना संजय व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना पकडले व त्यांचे नाव पत्ता विचारत चौकशी केली. त्यावेळी त्यांच्याजवळ सुमारे १६ हजार रुपये किंमतीची ४० किलो एवढी कोळंबी आढळून आली. याबाबत संजय मांजरेकर यांच्या तक्रारी नंतर मालवण पोलिसांनी त्या चारही जणांवर चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.