मालवण शहरातील बेकायदेशीर दारू विक्रीवर कारवाई करावी कमलाकर खोत यांची मागणी

मालवण,दि.७ एप्रिल

मालवण शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याने तरुण पिढी उद्धवस्त होत आहे. यामुळे बेकायदेशीर दारू विक्रीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी वीज वितरणचे सेवानिवृत्त कर्मचारी कमलाकर खोत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.

दरम्यान, खोत यांनी शहरातील बेकायदेशीरपणे होत असलेल्या दारू विक्रीच्या अड्ड्यांचीही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांना सादर केलेल्या निवेदनात दिली आहे. यामुळे तरुण पिढीला वाचविण्यासाठी पोलिसांनीच कडक पाऊले उचलावीत, अशी अपेक्षा खोत यांनी केली आहे.

पोलीस यंत्रणेने सक्षमपणे कारवाई केल्यास शहरातील बेकायदेशीर दारूधंदे बंद होवू शकणार आहेत. यासाठी पोलिसांनी शहरातील वास्तव्याची जाणीव करून घेऊन कडक पाऊले उचलली पाहिजेत. किनारपट्टीवर रात्रीच्यावेळी तरुणाई मद्यधुंद पद्धतीने वावरताना दिसत आहे. आताच यावर पाऊले उचलली गेली नाही तर भविष्यात दारूच्या व्यवसायापायी अनेक कुटुंबे उद्धवस्त होण्याची भीती आहे, असेही श्री. खोत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.