प्रांताधिकारी जगदिश कातकर यांचे मतदान प्रक्रियेबाबत मार्गदर्शन;कणकवली येथे १६६८ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
कणकवली दि .८ एप्रिल(भगवान लोके)
निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकारी,कर्मचारी यांनी आपल्यावरील जबाबदारीबाबत माहिती करून घ्यावी. आवश्यक ते प्रशिक्षण घेऊन कामकाज करावे. काही शंका असल्यास त्याबाबत निरसन करून घ्यावे. तसेच निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे राबवा, असे आवाहन प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी केले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांसाठीचे पहिले प्रशिक्षण शनिवारी येथील भगवती मंगल कार्यालयात दोन सत्रात झाले. प्रांताधिकारी जगदिश कातकर यांनी या कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रिया बिनचूक होणे व त्याअनुषंगाने मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते. या प्रशिक्षण शिबिरात १६६८ कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान, या प्रशिक्षणाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी भेट देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात सकाळी ९ ते १ व दुपारी २ ते ६ अशा दोन सत्रात झालेल्या मार्गदर्शनासाठी चांगली व्यवस्था करण्यात आली होती. मंगल कार्यालयाच्या ठिकाणी तसेच बाहेर पार्किंग व्यवस्थेसह नियोजन करण्यात आले होते. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जगदिश कातकर यांच्यासोबत कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे, वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, देवगड तहसीलदार संकेत यमगर तसेच सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, यांच्यामार्फत आवश्यक कर्मचारी, तलाठी प्रशिक्षणार्थिसाठी सर्व सोईसुविधाही उपलब्ध करण्यात आल्या होत्या. याबाबत विविध पथके, कक्ष
स्थापन करून नियोजन करण्यात आले होते. तसेच प्रशिक्षणाच्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिकेचीही सोय करण्यात आलेली होती. सकाळच्या सत्रात एक हजार तर दुपारी उर्वरित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
शनिवारी आयोजित करण्यात आलेले हे प्रशिक्षण पहिल्या टप्प्यातील होते. या कणकवली विधानसभा मतदारसंघात एकूण ३३२ मतदान केंद्रे असून त्याठिकाणी मतदान केंद्रांध्यक्षांसहीत चार कर्मचारी व राखीव कर्मचारी यांच्यासाठीचे हे प्रशिक्षण होते. दुसऱ्या टप्यातील प्रशिक्षणही लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.