कणकवलीत ट्रान्सफार्मर शिफ्ट करून ट्रायल टेस्ट घेताना स्फोट

विज ग्राहकांना मोठा फटका; फ्रीज, टीव्ही, इस्त्री, मिक्सर आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक

कणकवली दि.९ एप्रिल(भगवान लोके)

कणकवली रेल्वे स्टेशन येथील नूतनीकरण कामादरम्यान रस्त्यात असलेला ट्रान्सफार्मर शिफ्ट करून ट्रायल टेस्ट घेत असताना सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ट्रान्सफार्मरचा स्फोट झाला. त्याचा फटका रेल्वे स्टेशन परिसरातील विज ग्राहकांना बसून घरगुती वापरातील फ्रीज, टीव्ही, इस्त्री, मिक्सर आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या.या घटनेनंतर माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेवक संजय कामतेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत विजवीतरण च्या अभियंत्यांना धारेवर धरले.त्यानंतर कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी नुकसान झालेल्या ग्राहकांना मदत देण्यात येणार असल्याचेही नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.

तात्काळ नुकसानग्रस्त ग्रामस्थांच्या नुकसानी चे पंचनामे करण्यात सांगत त्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. त्यांनंतर वीज वितरण च्या अभियंत्यांनी नुकसानग्रस्त ग्रामस्थांच्या घरी जात नुकसानी चे व्हिडीओ शूटिंग घेत पंचनामे करून नुकसान भरपाई चा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवत असल्याचे सांगितले. रस्त्यात असलेला ट्रान्सफर्मर शिफ्ट केल्यानंतर नवीन ट्रान्सफार्मर बसवताना आवश्यक व्होल्टेज आणि तत्सम काळजी घेणे ट्रायल पूर्वी घेणे गरजेचे असते. मात्र केवळ ट्रान्सफार्मर बसविणाऱ्या ठेकदारावर विसंबून विजवितरण अभियंत्यांनी केलेल्या हलगर्जीपणाचा नाहक फटका ग्राहकांना बसला. ट्रान्सफार्मर ट्रायल घेण्यापूर्वी आवश्यक खबरदारी जबाबदार विजवीतरण अधिकाऱ्यांनी घ्यावी,अशी मागणी करण्यात आली.