सावंतवाडीत “जल्लोष रामलल्लाचा” हा आगळा वेगळा उपक्रम

सावंतवाडी, दि.१६ जानेवारी

अयोध्यात होणार्‍या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत “जल्लोष रामलल्लाचा” हा आगळा वेगळा उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. यात महाआरती, गरबा, दांडिया दिपोत्सवासह फटाक्याची आतिषबाजी, डिजेची जुगलबंदी कार्यक्रमाचे आकर्षण असणार आहे, अशी माहिती ओंकार कलामंचाचे अध्यक्ष अमोल टेंंबकर यांनी दिली. ओंकार कलामंच सावंतवाडी यांच्या माध्यमातून २२ तारखेला सायंकाळी साडेसात वाजता येथील श्रीराम वाचन मंदिर समोर हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी सामाजिक बांधिलकी, श्री सावंतवाडी पाटीदार समाज आणि डिजे शुभम आणि डिजे अखिलेश हे सहकार्य करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज येथे पत्रकार परिषद घेवून ही माहिती देण्यात आली. यावेळी ओंकार कलामंचाचे कोरिओग्राफर अनिकेत आसोलकर, सचिन मोरजकर, सिध्देश सावंत, पाटीदार समाज संघटनेचे अध्यक्ष मुकेश पटेल, अरविंद पोकार, भुवन नाईक, नितेश देसाई, मृणाल पावसकर, चैतन्य सावंत, निखिल माळकर, रोहित गावडे, शुभम सावंत, अखिलेश कानसे आशिष सुभेदार,नईम मेमन,हंजला नाईक आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. टेंबकर म्हणाले, अयोध्यात होणार्‍या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीत या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात भगवे झेंडे आणि डोक्याला नाम लावून सोहळ्याचा आनंद साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विशाल परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी पंचायत समिती सदस्य संदिप गावडे, माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, अ‍ॅड. अनिल निरवडेकर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी साडेसात वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत रामलल्लाचे पुजन आणि महाआरती होणार आहे. त्यानंतर रामाच्या जीवनावर आधारित नृत्य प्रकार सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर श्री सावंतवाडी पाटीदार समाजाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गरबा सादर करण्यात येणार आहे. त्याच बरोबर दांडिया नृत्य होणार आहे. त्यानंतर खुल्या वेशभुषा स्पर्धा घेण्यात येणार आहे. यावेळी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या परिसरात दीपोत्सव करण्यात येणार आहे. अ‍ॅड. अनिल निरवडेकर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी फटाक्याच्या आतिषबाजी करण्यात येणार असून शेवटी डिजेच्या तालावर उपस्थित रामभक्तांकडून जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित राहणार्‍या रामभक्तांनी डोक्याला नाम तसेच पांढरे किंवा भगवे कपडे घालून या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान यावेळी घेण्यात आलेल्या रांगोळी व खुल्या वेशभुषेसाठी प्रत्येकी तीन हजार, दोन हजार आणि एक हजार अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या स्पर्धकांनी आपली नावे अनिकेत आसोलकर ९४२२९०८८५३, भुवन नाईक ९६०७२९३५८८ या नंबरवर संपर्क साधून द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.