देवगड, दि.१६ जानेवारी
कुणकेश्वर गावातील पांडवलेणं व या गुहेत आढळणाऱ्या मूर्ती तसेच प्राचीन संस्कृत साहीत्यातील संदर्भ पहाता ही पांडवांची गुहा नसुन हे प्राचीन राजवंश मंदिर आहे, असे मराठवाडा इतिहास परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात प्राच्यविद्या अभ्यासक श्री. रणजित हिर्लेकर यांनी प्रतिपादन केले. मराठवाडा इतिहास परिषद, औरंगाबाद यांचे त्रेचाळीसावे राष्ट्रीय अधिवेशन सातारा या छत्रपती शाहुंच्या ऐतिहासिक राजधानीत भरले होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बिजारोपण केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या सातारा येथील प्रख्यात छत्रपती शिवाजी महाविद्यालयात या राष्ट्रीय इतिहास परिषदेचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनाचे उद्घाटन डाँ. अवनिश पाटील, नागमंडला(कर्नाटक) मधील डाँ. एन्. जी. प्रकाशा प्राचार्य डाँ. राजेन्द्र मोरे यांच्या उपस्थितीत पार पडले.
या अधिवेशनात कुणकेश्वर येथील पांडव लेण्यां संदर्भातील आपला रिसर्च पेपर सादर करताना श्री. रणजित हिर्लेकर म्हणाले, श्री देव कुणकेश्वराच्या पूर्व दिशेच्या डोंगर उतारावर अंदाजे १९२० सालच्या आसपास लागवडीसाठी खोदकाम सुरु असताना दार बंद करुन ठेवलेली एक गुहा सापडली. खरे तर हे एक जांभ्या कातळात कोरलेले लेणे आहे. हे लेणे दक्षिणाभिमुख असुन या गुहेतील मूर्ती गुहेच्या भिंतीवर कोरलेल्या नसून अलग व स्वतंत्र रीत्या काळ्या बेसाल्ट खडकात कोरलेल्या आहेत. या प्रकारचा दगड या भागात अभावानेच सापडतो. या मूर्ती हिरवट, काळ्या बेसाल्ट दगडात कोरुन नंतर त्या ठेवण्यासाठी ही गुहा खोदलेली आहे. या गाभाऱ्या लगत स्वतंत्र मंडप आहे. मंडपात डावी व उजवी कडे बसण्यासाठी बाक वजा थोडासा उंचवटा केलेला दिसतो.
या मंडपास पूर्वी लाकडी दुपाखी कौलारु छत घालीत असावेत. आज जरी ते पडुन गेलेले असले तरी ते घालता येण्याजोगी रचना येथे केलेली दिसते. पुर्वी मंडपास स्वतंत्र दरवाजा असावा. पण आज या भागातील मुख्य दरवाजा असणारी समोरची भिंत पूर्णतया तुटून नाहीशी झाली आहे. तरी येथील भिंतीच्या पायाच्या राहीलेल्या भागांवरुन हा अंदाज बांधता येतो. गुहेत काळ्या पाषाणात रेखीवपणे कोरलेल्या ज्या काही प्राचीन मूर्ती सापडल्या होत्या. यामधे शिवलिंग, नंदी व शिवोपासक स्त्री-पुरुषांचे एकुण १८ मुखवटे आहेत. भिंतीत केलेल्या स्वतंत्र कोनाड्यात पाच सुटे स्वतंत्र मुखवटे ठेवले आहेत.
ही गुंफा प्राचीन राजवंशाचे मंदिर आहे हे आपले संशोधन संदर्भासहीत मांडताना श्री रणजित हिर्लेकर पुढे म्हणाले, मथुरेला सम्राट कनिष्काच्या कुशाण राजवंशाचे मिळालेले पुतळे प्रसिध्द आहेत. हे कुशाण राजवंशाचे मंदिर होते हे इतिहास संशोधकांनी मान्य केलेले आहे. यामुळे प्राचीन काळात राजवंशातील दिवंगत राजांचे स्मारक करण्याची पद्धत असलेली दिसुन येते. कालिदासा पुर्वी होऊन गेलेल्या महाकवी भासाने लिहीलेल्या प्रतिमा रामायणा वरील आधारीत या संस्कृत नाटकातही आपणास असे राजवंश मंदिर बांधण्याची पद्धत त्या काळात होती असा संदर्भ सापडतो.
कुणकेश्वरातील हे गुहा मंदीर दक्षिणाभिमुख आहे. दक्षिण ही यमाची दिशा मानली गेली आहे. त्यामुळे या गुहेचे दार दक्षिणेकडे असणे उचितच आहे. असे मत व्यक्त करीत या शिल्पां विषयीचा आपला अभ्यास मांडीत असताना श्री. रणजित हिर्लेकर यांनी पुढील मुद्दे स्पष्ट केले. हे सर्व मुखवटे एकाच समान काळातील नाहीत हे या शिल्पांच्या कोरीव कामातील बारकाव्यावरुन त्यांनी उपस्थित इतिहास संशोधकांना दाखवुन दिले. इतकेच काय तर या राजवंशातील सुरवातीचे राजे कोणते व नंतरचे राजे कोणते याचा क्रमही आपणास लावता येईल इतके या सर्व मूर्तीच्या शिल्प कामातील फरक आपणास दिसुन येतो, असेही ते यावेळी म्हणाले.
कोणतेही नवे राज्य निर्माण होते तेव्हा ते आर्थिक दृष्ट्या फार संपन्न नसते. नंतर त्या राज्याचा विस्तार जसा वाढतो तशी राजघराण्याची संपन्नता वाढते व ही संपन्नता त्या राजवंशाच्या तात्कालीन वास्तु शिल्पादी निर्मिती मधे दिसुन येते. तसे फरक आपणास या सर्व मुखवट्यांमधे बारकाईने निरिक्षण करता ओळखता येतात. राज्य जेव्हा उतरणीला लागते तेव्हा त्याची आर्थिक परिस्थिती देखील खालावत जाते व या काळातील शिल्प कलांमधे या आर्थिक परिस्थितीमुळे कामातील घसरत जाणारा स्तर दिसुन येतो. तसा बदल या काही मुखवट्यांमधे ही समजुन घेता येतो. त्यामुळे कुणकेश्वर चे पांडवलेणे हे एका प्राचीन शिवभक्त राजवंशाचे मंदीर आहे हे संदर्भासह स्पष्ट होते. अकराव्या शतकात कुणकेश्वर मंदीर बांधण्या पुर्वी पासुनच येथे शिवभक्ती व या स्थानाचा शिव महीमा प्रसिद्धीस आलेला होता, असे या वरुन दिसुन येते.