वेंगुर्ला,दि.१० एप्रिल
शिवसेनेचा वेंगुर्ला शहर युवा सेनेतर्फे तात्काळ सेवेसाठी नादुरूस्त झालेला अग्निशमनबंब त्वरीत काम करून सेवेत सुरू करा अन्यथा नगरपरिषदेसमोर आंदोलन छेडण्याच्या दिलेल्या इशा-यामुळे नगरपरीषद प्रशासनाने याची दखल घेत तत्काळ अग्निशमनबंबाची दुरूस्ती करून तो सेवेत दाखल केला असल्याची माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख उमेश येरम यांनी दिली.
दरम्यान, नादुरूस्तीचे काम करुन सेवेसाठी तत्पर केलेला अग्निशमनबंब पुन्हा केव्हाही नादुरूस्त होऊन सेवेत व्यत्यय येऊ शकतो. त्यामुळे नागरीकांना अत्यावश्यक सेवेसाठी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे नवीन अग्निशमनबंब देण्याची मागणी उमेश येरम यांनी केली आहे. लाखो रूपये खर्चून शहरातील घोडेबांव गार्डनमधील कारंजा बंद पडलेला आहे. या भागात लावलेली झाडे व लॉन यांना पाणी न दिले गेल्याने ती वाळत आहेत. या गार्डनला दोन गेट असून सुद्धा एक गेट बंद ठेवून नागरीकांची गैरसोय केली जात आहे. याबाबत सुचना करूनही याकडे नगरपरीषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
रामेश्वर मंदिर सुशोभिकरणाचे काम दिवसापूर्वी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बंद पडले होते. याची माहिती मिळताच जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर यांनी नगरपरिषद प्रशासन, ठेकेदार, रामेश्वर देवस्थानचे विश्श्वस्त यांची एकत्रित मिटिंग घेऊन हे काम बंद होण्याचे कारण विचारून घेत ते काम तुम्ही सर्वांनी लक्ष घालून वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार ते काम सुरू झाले असल्याची माहिती श्री.येरम यांनी दिली.