वैभववाडी,दि.१० एप्रिल
महा विकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी खासदार म्हणून केलेले काम जनतेला माहित आहे. त्यांचा वाडी वस्ती मध्ये जनसंपर्क आहे. खासदार राऊत यांनी आपल्या करकिर्दीत नातेसंबंध जोपासण्याचे काम केले आहे. म्हणून जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. खासदार राऊत यांच्या कामाची पोच पावती विरोधकांकडून सुद्धा दिली जाते. त्यामुळे खासदार राऊत विजयाची हॅट्रिक करणार असा विश्वास उबाठा सेनेचे नेते अतुल रावराणे यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची बैठक वैभववाडी येथे पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत श्री रावराणे बोलत होते. यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष दादामियाँ पाटणकर, काँग्रेस महिला जिल्हा अध्यक्ष मीना बोडके, तालुका प्रमुख मंगेश लोके, दिलीप नारकर, संदीप सरवणकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रावराणे पुढे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत उबाठा सेनेचे उमेदवार विनायक राऊत यांना विक्रमी अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या बैठकीत करण्यात आला. आम्ही विजयाची हॅट्रिक करू तुम्ही पराभवाची हॅट्रिक करा असा टोला त्यांनी भाजपाला लागवला आहे.
यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच भाजपा वर टीका केली. राणे यांच्याकडे 25 वर्षे जिल्ह्याची सत्ता आहे. मात्र ते जनतेसाठी काहीही करू शकले नाहीत.त्यामुळे त्यांच्या वर पंतप्रधान मोदींच्या नावाने मते मागावी लागतात. राणे स्वतःच्या नावाने मते मागू शकत नाहीत एवढी नामुष्की त्यांच्यावर ओढवलेली असल्याचा आरोप त्यांनी केला. एक बलाढ्य नेता म्हणून भाजपाने राणेना पक्षात घेतले, केंद्रात मंत्री केले मात्र त्यात ते आपला प्रभाव दाखवू शकले नाहीत.
जिल्ह्यातील भाजप ही राणे भाजप आहे. त्यामुळे जुने भाजप कार्यकर्ते नाराज असून आगामी निवडणुकीत त्यांचा उबाठा सेनेला फायदा होणार असल्याचे रावराणे यांनी सांगितले.
महायुतीचे संभाव्य उमेदवार किरण सामंत व नारायण राणे ठेकेदारी सांभाळत आहेत. ठेकेदारी आणि ठेकेदार एवढ्या मर्यादेत यांची कारकीर्द राहिली आहे. हे जनता बघत आहे. केंद्रात लघु सूक्ष्म मध्यम उद्योग मंत्री असलेल्या नारायण राणे यांनी जिल्ह्यात एक व्यवसाय आणला असेल तर त्यांनी दाखवावे असे आव्हान रावराणे यांनी दिले आहे.
राणेनी जिल्हा विकून खाल्ला आहे. आमदार नितेश राणे तालुक्यात एम आय डी सी आणणार म्हणून सांगत आहेत. मग नारायण राणे उद्योग मंत्री असताना तुम्ही झोपला होता काय? असा सवाल रावराणे यांनी उपस्थित केला आहे. ठेकेदारांकडून पैसे जमा करायचे आणि आपलं घर चालवायचं ही आमदार नितेश राणे यांची स्थिती आहे. आमदार राणे यांची ठेकेदारांशी असलेले साठेलोटे, क्रशर मधील पार्टनरशिप, घाटाच्या कामात ठेकेदाराशी काय डील केली हे सर्व माहित आहे. त्याचा योग्यवेळी पुरावा देऊ असा इशारा रावराणे यांनी दिला आहे. जनताच यांना उत्तर देईल असे रावराणे यांनी स्पष्ट केले.
विनायक राऊत यांच्या विजयासाठी प्रत्येक बूथ प्रमाणे बैठका सुरु आहेत. आतापर्यंत 155 खळा बैठका झाल्या आहेत. राऊत यांच्या निमित्ताने विकास कसा करतात ते दाखवून देऊ. असे त्यांनी स्पष्ट केले.
Home आपलं सिंधुदुर्ग खासदार राऊत यांच्या कामाची पोच पावती विरोधकांकडून सुद्धा दिली जाते त्यामुळे खासदार...